तीन गझला : प्रा.विद्या देशमुख

 




१.


आजहून काल चांगला किती असायचा

हा विचार नेहमीच 'आज' संपवायचा


अंगणास घाण तो समोरच्या करायचा

आणि आपल्या घरास स्वच्छ दाखवायचा


मी विचार दूरचा करायचा तरी कधी 

जर समोरचाच प्रश्न जास्त गुंतवायचा 


मन सुकायला नको बजावले जरी मला

मी फुलायला तुझा ऋतू कुठून यायचा


मी तुझ्यात पाहताच देखणी दिसायचे

वेगळा म्हणायलाच आरसा बघायचा


एकरूप व्हायला अधीर रात्र व्हायची

तेवढी दिवस  मधूर ओढ वाढवायचा


म्हणून राहिला नसेल जास्त काळ भूवरी

देव जीवनात लाभला मला म्हणायचा


२.


कोण घेते भेट आवर्जून वाटेवर

तर कुणी जाते सहज टाळून वाटेवर


मागच्यांनी माग त्यांचा घेत चालावे 

पण तसे जावे ठसे ठेवून वाटेवर


रांग नाही कोणती मागेपुढे माझ्या

मीच माझ्या चालते मागून वाटेवर


मी दऱ्याखोऱ्यातही अगदी सहज फिरते

ठेवतिल खड्डे मला अडवून वाटेवर?


पावले झाली दगड आहेत ही माझी 

ठेवता मग का फुले पसरून वाटेवर


सूर्य मावळला तरी रस्ता शितल नाही 

 तावते आहे कशाचे ऊन वाटेवर 


त्यामुळे तर राहते माझ्यामधे विद्या

सावली नसतेच घर सोडून वाटेवर


३.


जगायला स्मृती जणू असेल भाकरी मला

हवी कशास जादुई छडी तुझी परी मला 


बनून पूल जोडते कड्यांमधील अंतरे

मनांमधील जांभळ्या... नका म्हणू दरी मला


चराचरास जन्म मी दिल्यास रंग लाभतो

नसेल नभ जवळ म्हणुन.. म्हणाल पांढरी मला?


असेल फाटले तिथे बनू सुई शिवायला

जुळायची कशी स्थिती करून कातरी मला


खडूफळ्यात पाहते विठू मुलांत पाहते

अजून वेगळी कुठे असेल पंढरी मला


बनून बाप पाहता... निघून माय जायची

जमेल पोकळी तुझी भरायला बरी मला


कशामुळे फिरू तरी सतत स्वतः सभोवती 

विराम जर तुझ्यामधे मिळेल ईश्वरी  मला

..............................................

No comments:

Post a Comment