१.
हातावरी जयांच्या सजले घड्याळ आहे
कमळावतीस कायम त्यांचा विटाळ आहे
हाती मशाल घेउन डरकाळतोय नुसता
आयाळ पिंजणारा भलता मवाळ आहे
इंजिन सुसाट धावे, थांबा कुठे कळेना
नुसतीच आगपाखड, फुटके कपाळ आहे
हाती धरून झाडू जो सैरभैर फिरतो
त्याच्या घरात खच्चुन भरले गबाळ आहे
एकात एक नाही, बापात लेक नाही
अन् कारभार त्यांचा पुरता ढिसाळ आहे
यांची दिवाळखोरी, त्यांच्या घरी दिवाळी
गरिबाघरी सदोदित थंडा फराळ आहे
अन्याय रोखण्याला आला नवा मसीहा
कोणासमोर बघुया झुकणार काळ आहे
२
समोर येइल ते ते वारेमाप गटकतो मित्रा
बील द्यायच्या वेळेला हमखास सटकतो मित्रा
फोन तुझा स्विच ऑफ कधी, तर कधी लागतो बीझी
बिनकामाचा दिवसरात्र तू कुठे भटकतो मित्रा
बोलत होता जेव्हा तो, वाचाच तुझी बसलेली
तो गेल्यावर कशास आता ग्लास पटकतो मित्रा
तिची नि माझी जिथे चोरुनी भेट व्हायची असते
त्याच ठिकाणी तू मजला हटकून लटकतो मित्रा
वेळच नसतो तुला एरवी माझ्याशी बोलाया
कामाच्या वेळेसच का मुद्दाम अटकतो मित्रा
समोर माझ्या एक बोलतो समोर त्यांच्या दुसरे
हाच तुझा तर स्वभाव मजला खूप खटकतो मित्रा
तुझ्यावरी भरवसा ठेवुनी जमवुन बसतो मैफिल
आणि आयत्या वेळेला तू का न फटकतो मित्रा
३
ब्लाॅक तुझा, अनब्लाॅक तुझा
डेंजर आहे शाॅक तुझा
गच्चीवरती भिरभिरणे
वा रे! माॅर्निंग् वाॅक तुझा
तयार हे रॅकेट सदा
टोलवून दे काॅक तुझा
ग्रीन बोर्ड हिरवा तू अन्
ठिसूळ मी हा चाॅक तुझा
बोल जरा अपुली भाषा
समजत नाही टाॅक तुझा
मग्न जरा टीव्हीमध्ये
ऐकला न मी नाॅक तुझा
बदललाय पासवर्ड मी
बदलुन घे तू लाॅक तुझा
४
पक्षापक्षामध्ये आहे तेजीमंदी
कुणास चिंता, तर कोणाची आहे चंदी
निष्ठावंताच्या हाती सतरंज्या, गाद्या
ऐरे गैरे आले नुसते छंदीफंदी
भेटत नाही सहजासहजी भोळा शंकर
देवाच्या-भक्ताच्यामध्ये सदैव नंदी
रोजरोजचे ब्रह्मकमळ फुलतात कधी का
नशिबामध्ये फक्त आपुल्या तर जास्वंदी
जन्माचे दारिद्र्य अता संपेल फटाफट
फोटोमध्ये दिसतिल आता ते आनंदी
भार वाहुनी लेकुरवाळा झुकला विठ्ठल
ज्याचे त्याचे ठरलेले देहू-आळंदी
५
वागले तू पाहिजे रे नॅचरल
आतुनी आहेस निव्वळ ऍनिमल
लोक नावे ठेवणारच च्यायला
तू नको ना घेत जाऊ पर्सनल
सोडले नाहीच ईगोला कुणी
दोन रेषा चाललेल्या पॅरलल
खूप दिवसांनी जराशी 'लावली'
लाव ना गाणे जरा ऑकेजनल
ठीक आहे, फेक आहे मी, खरे
तू तरी आहेस का ओरीजनल?
बातम्या ऐकून घे तू दिवसभर
शेवटी होशील तूही नॅशनल
एक विषयाच्याच कविता वा गझल
का बरे झालेत सारे सीझनल?
..............................................
No comments:
Post a Comment