१.
वादळाने हात माझे पोळल्यावरती
जाग आली चार चटके सोसल्यावरती
काल माझ्या भोवताली सावली होती
दाह झाला झाड भक्कम तोडल्यावरती
शब्द माझे वेचताना भेटला तोही
भावनांच्या आर्त ओळी खोडल्यावरती
होत गेली फार गर्दी आपली परकी
प्राक्तनाने दार माझे ठोकल्यावरती
लेखणीला धार आली मोकळी झाले
आत माझ्या शल्य काही बोचल्यावरती
२.
गेले तर ते कायम जाते क्षणासारखे
जगणे आहे केवळ येथे दवासारखे
खुल्या हवेशी नाते जुळले तेव्हा कळले
घेता येते कवेत अंबर खगासारखे
कायम आहे गृहीत धरले मला सारखे
शब्द पेरले आधी केवळ मधासारखे
पदरी पडल्या वाटेवरती चालत गेले
वागू दे ना आता क्षणभर मनासारखे
नको प्रतिष्ठा नकोच पदवी भार वाहणे
व्हावे म्हणते क्षणात हलके ढगासारखे
३.
विचारांची दिशा बदलून पाहू का
नव्याने मी मला घडवून पाहू का
जिथे मी राहिले मागे जगापेक्षा
तिथे रस्ता नवा बनवून पाहू का
तुझ्या प्रेमात माझे खेळणे झाले
नव्या खेळात मन रमवून पाहू का
परिक्षण नेमके केलेच नाही मी
चुकांना आज कवटाळून पाहू का
मुळांना लागलेला घाव आहे तो
हळू फुंकर तिथे घालून पाहू का
दिसत नाही कुठे गेला कवडसाही
तमाची काजळी उचलून पाहू का
.....….....................................

No comments:
Post a Comment