प्राक्तनाचे भोवरे : धनजंय तडवलकर

 


                             

'क्षणा क्षणाला देत रहावी सत्त्वपरीक्षा

हा टोकाचा संयम असणे जगणे म्हणजे..'


इतकी सुंदर द्वीपदी लिहिणारा शिवदादा म्हणजे जे जगलो, जे अनुभव घेतले, परकाया प्रवेश करून जे दिसलं, तेच लिहिणारा कवी -गझलकार !  कोणालाही दोष न देणारा, जे सामोरं येईल त्याला विश्वासाने तोंड देणारा, सगळ्यांच्या मदतीला धावणारा असा शिव डोईजोडे म्हणजे कमाल माणूस ! तुम्ही थोडा जरी वेळ त्याच्या बरोबर काढलात ना, तर तुम्हालाही त्याचा नक्की अनुभव येईल.


एकेकाळी गझलसम्राट सुरेश भट यांच्याबरोबर नाळ जुळलेला दादा त्यांच्याकडून खूप काही शिकला. त्यांच्याबरोबर राहिला, खूप गझला लिहिल्या, कविता लिहिल्या पण आयुष्यातल्या एका प्रसंगाने सारं सारं शून्य झालं, ना गझल राहिल्या, ना कविता ! पण दादाची ही सत्त्वपरीक्षा होती आणि दादाने त्यावेळी दाखवलेला टोकाचा संयम, त्यामुळे त्याला वरील द्वीपदी सुचली नसती तरच नवल !

१९ ऑगस्ट २०२३ ला प्रकाशित झालेला, शिव डोईजोडे यांचा 'प्राक्तनाचे भोवरे' हा पहिला वहिला गझलसंग्रह. ८५ गझला असलेला हा संग्रह अगदी वाचनीय झालाय तो दादाच्या गझलीयतमुळे ! आता हेच काही शेर पहाना :


'नेहमी भेटीस येते आपल्या ती

वेदनेचे सोयरे आहोत आपण..

     

'जीव अडकून पडतो नको तेवढा

दूर जात्या क्षणांना पुकारू नये.. '

   

आठवांनी मी तिच्या व्याकूळ होतो

भेटतो तेव्हा तिला माझ्या स्वतःतच.. '


'विरोध केला नाही कायम मौन पाळले

दुनियेला मी यासाठी आवडलो होतो.. '


भट साहेब नेहमी म्हणायचे, ' चांगला कवी व्हायच्याआधी चांगला माणूस होणे आवश्यक आहे !' भट सरांच्या या म्हणण्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवदादा डोईजोडे !  शिवदादाचा हा शेरच पहाना :


'निवडली नेहमीची वाट मी आहे सरळ माझी

तरी फसगत इथे होणार ठरलेली अटळ माझी..'


अतिशय सरळ चालणाऱ्या या माणसाचीही नियतीने फसगत केली, दु:खे दिली पण हा माणूस लढला आणि जिंकलाही. म्हणूनच तो म्हणतो :


'कशी करू तक्रार तरी मी या दु:खाची 

रट्टे घट्टे खाता खाता घडलो होतो..'


'पर दु:ख शीतल' असं दादूच्या बाबतीत असेल असं मला बिलकुल वाटत नाही. कारण त्याचे हे दोन शेर :


'काय शिकतील सांगा मुले आमची

ना फळा, ना खडू, मोकडी बाकडे..'

 

मग तो ईश्वरालाच विचारतो :

     

'का दिसेना तुला या जिवांची दशा

 काय डोळ्यांस तू लावली झापडे..?'


त्यांचे डोळ्यावरचे दोन शेर पहा :


'कशी भरते, रिती होते हवी तेव्हा

तुझ्या डोळ्यांतील कावड..खरे नाही..'


डोळ्यांमध्ये नकोच ठेवू मला कधी तू 

ओघळेन मी मजला कायम भिती वाटते..'


दादाचे आईबद्दलचे शेरही भवनाप्रधान आणि मनाला विव्हळ करणारेच :

        

'पाहते आई किती कौतुकाने

मग मलाही बाळ व्हावे वाटते ना..'


'खरबरीत झालेत किती हे हात जरी राबून तिचे

डोक्यावरुनी फिरला तेव्हा स्पर्श वाटला तलम किती'


चांगली-वाईट परिस्थिती तर प्रत्येकावरच येत असते. त्यावरचे हे शेर पहा :


'श्रेय घेतले प्रत्येकाने आपल्याकडे

 माझ्या नावावर सारे नुकसान टाकले..'


'तू दिलेला नेमका कुठला कळेना

 घाव हृदयाचे जरी मोजून झाले'


'ठेवू नये कुणीही ही जखम मोकळीशी 

घेऊन मीठ येती बघ हात सांत्वनाचे..'


पण कोणालाच दोष न देणारा आणि मनात प्रेमच ठेवणारा दादाही कधीतरी म्हणून जातो :


'एवढी वैराण झाली का मनेही आपली?

की गरज आहे तिथे माणूसकी पेरायची .. '


आपल्या आचार-विचारात, स्वभावात, वागण्यात माणुसकी बाळगणाऱ्या दादालाही जेव्हा हे सांगावेसे वाटते तेव्हा मनात कल्लोळ झाल्याशिवाय राहत नाही.


आधी सांगितल्याप्रमाणे, जे जे सोसले ते ते शब्दांत आलं, इतकं साधं, स्वच्छ आणि सरळ असल्यामुळे दादाच्या गझलमधील खयाल वरवर सरळ वाटले तरी ते खोल अर्थ आणि अर्थात सुरेख गझलीयत घेऊनच येतात, हे खालील काही शेरांमधून नक्की जाणवते !


'पाखरे जाती उडुन दाही दिशांना

सोबतीला तेवढ्या उरतात भिंती..'

 

'सुखात आहे आईला ती सांगत होती

उतरत होते गाली काजळ पुन्हा एकदा..'


'काळजाचा रंग तितका कंच हिरवा पाहिजे

वाढणारे वय तसाही फक्त असतो आकडा..' 


'काय आहे फास की झोका कळेना

कासरा फांदीस त्याने टांगल्यावर...'


'जन्मभर झिजला मुलाबाळांकरीता

वाट त्यांनी दावली वृद्धाश्रमाची..'


आपण ज्या भागात राहतो, त्या मराठवाड्याचा सार्थ अभिमान असलेल्या दादाने मराठवाड्यावर एक पूर्ण गझल लिहिली आहे. त्यातील दोनच शेर पहा :


'सोन्यासमान येथे शब्दास मोल आहे 

वचनास जागणारा माझा मराठवाडा ..

     

भेगाळली भुई अन् डोळ्यांत पावसाळा 

दुष्काळ सोसणारा माझा मराठवाडा...'


आपल्या गझलमधून असं बरंच काही सांगणारा सुचवणारा दादा, आपल्या स्वच्छ स्वभावाने, आपल्या आपुलकीने सगळ्यांना आपलंसं करणारा, कोणाबद्दल

कधीच वाईट न बोलणारा, सगळं दु:ख स्वतःकडे ठेवून, जगाला आनंद वाटणारा दादा, या संग्रहाच्या प्रत्येक पानात, आपल्याला कुठे ना कुठे दिसत राहतो आणि हेच या संग्रहाचे मला मर्म वाटते ! 


या संग्रहासाठी ज्यांनी अतोनात कष्ट घेतले, त्यांनी आपल्या आर्त भावना अगदी थोडक्या शब्दांत व्यक्त केल्या आहेत. दास पाटील ( प्रकाशक- समग्र प्रकाशन) म्हणतात :

   

"दादूसोबत गझल, कविता या पलीकडे जाऊन जे नातं तयार झालंय, हीच माझ्या आयुष्याची कमाई समजतो." तर अल्पना म्हणतात, "दादा दृढनिश्चयी  आहे. व्यवसाय, मुलं लहान असल्याने कौटुंबिक जबाबदारी मोठी होती. या गोष्टींना प्राथमिकता देण्याचा निर्णय त्याने घेतला आणि गझलेपासून तब्बल ३०/३२ वर्षे

स्वतःला तोडून टाकलं. पण आपल्या अत्यंत प्रिय  गोष्टीला अशी तिलांजली देऊन जगणं किती कठीण असतं, याची आपण कल्पना करू शकतो. त्याने पाठ फिरवली असली तरी गझलेने मात्र त्याची पाठ कधीच सोडली नाही.."

तर संदीप पटेल म्हणतात, "संवेदनशील मनाचा माणूस जेव्हा दु:ख कवितेत मांडत असतो, तेव्हा तो स्वतःही भवतालाशी एकरूप होत असतो आणि स्वतःला त्रास करून घेत असतो ! दादू अतिसंवेदनशील प्रकारात मोडतात ." तर डॉ.माधुरी म्हणतात , " संस्कृत भाषेत ' दा ' धातूचा अर्थ आहे 'देणे' आणि त्या अर्थाला शब्दश: जागणारा आमचा माणूस आहे..ज्याला फक्त 'देता येते' असा हा दादा! दादा आम्हा सगळ्यांना तू आजपर्यंत इतकं दिलंस..तर आज आमच्याकडून तू हे 'घ्यायचं' आहेस..नाही म्हणायचंच नाहीयेस..कारण 

तुझ्या त्या भरलेल्या ओंजळीतून आम्हाला पुढच्या आयुष्यभर अजून बरंच काही घ्यायचंय.."

आणि शेवटी पण महत्त्वाचे मनोगत सौ.शारदा शिवकुमार डोईजोडे अर्थात दादाच्या प्रिय पत्नीचे! त्या म्हणतात, "खरंतर मला गझलमधला 'ग' सुद्धा माहीत नव्हता पण गझलरंगच्या मंचावर ह्यांची गझल प्रेक्षकांत बसून पहिल्यांदा ऐकली आणि आलेला अंगावरचा काटा, डोळ्यांतून वाहणारी नदी आणि अजून बरंच काही .. शब्दांत न मांडता येणारं..!" त्यांच्या मनोगताचा शेवट तर त्यांनी दादांच्याच एका  समर्पक शेराने केलाय ! त्या म्हणतात, "ह्यांच्या स्वप्नातला हा गझलसंग्रह ह्यांच्याही नकळत रसिकांच्या हातात सुपूर्द करताना, ह्यांच्याच शब्दांत एवढेच म्हणेन, "कारणे मिळतील  मरण्याची हजारो

पण तुझ्यासाठी जगावे वाटते ना.."


हा गझलसंग्रह एका अनोख्या प्रकाराने रसिकांच्या समोर आलाय. रसिकांनी त्याला दाद दिली आहेच; पण भविष्यकाळातही रसिकजन त्याला आपलंसं करतील हे नक्की. कारण या चौघांनी एक वेगळा पण अनुकरणीय पायंडा पाडून हा संग्रह रसिकार्पण केलाय. संग्रहाचे मुखपृष्ठ, अगदी संग्रहाच्या नावाला शोभेल असं दास पाटील यांनी केलं आहेच; पण संग्रहही देखणा केलाय!


दादाच्याच एका नजाकतभरल्या पण सकारात्मक शेराने हा लेख सम्पन्न करतो.


'श्वास येतो श्वास जातो प्राण घेतो हेलकावे

शाश्वती नाही क्षणाची पण तरीही गुणगुणावे'

............................................

धनंजय तडवळकर

मो.७८४१९८५८४२

No comments:

Post a Comment