एक आणखी मजला : दिवाकर चौकेकर




जीवना रे तू कसा

चांदणे की कवडसा 

दु:ख गेले देउनी 

एक झोका छानसा 


असे प्रांजळपणे कबूल करणारे गझलकार श्री प्रफुल्ल कुलकर्णी गेल्या चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ गझलेची आराधना, गझलेची साधना आणि गझलेची मनधरणी करत आहेत. दु:खाचे कुठल्याही प्रकारचे भांडवल न करता, उलट आपले आयुष्य हा एक झोपाळा आहे असे मानून त्यास एक छानसा झोका या दु:खाने दिला असा एक सकारात्मक विचार, वेगळ्याच प्रतिमांनी मांडणारे एक प्रतिभावान गझलकार श्री प्रफुल्ल कुलकर्णी, नांदेड (हल्ली मुक्काम पुणे) यांचा 'एक आणखी मजला' या गझल संग्रहाचे पार्सल हाती पडल्या पडल्या एखाद्या हावरट, हट्टी, लहान लेकरासारखं वरचं आवरण टराटरा फाडलं, पुस्तक चाळायला सुरुवात केली आणि आश्चर्याचे धक्केच बसायला सुरुवात झाली. पुस्तकाच्या पहिल्याच पानावर माझे नाव लिहून अभिप्राय लिहिण्याची प्रेमळपणे (पण हक्काने) केलेली विनंतीवजा मागणी (ऑर्डर म्हणा हवे तर) वाचायला मिळाली. पुस्तकात त्यानंतर ह्या पुस्तकाचे विवरण, फक्त दोन शब्दांत, '१०१ व्या मजल्यास' असे लिहिलेली अर्पण पत्रिका, त्यानंतर प्रख्यात अमेरिकन कवयित्री एमिली डिकिन्सन यांचा एक विचार उद्धूत केलेला आढळला. पुढच्या पानावर आद्य मराठी महिला गझलकारा आदरणीय सौ. संगीताजी जोशी (पुणे) यांची आशीर्वादरुपी, शुभेच्छारुपी प्रस्तावना वाचायला मिळाली आणि त्यापुढच्याच पानावर एक माणूस हातात एक भिंग घेऊन कशाचा तरी शोध घेत आहे असे चित्र छापलेले दिसले आणि त्यावर ....


इतिहास खरा गझलेचा पुन्हा तपासा 

उल्लेख कदाचित असेल तेथे माझा....


अशी खात्री विनम्रपणे बाळगणारे गझलकार श्री प्रफुल्ल कुलकर्णी प्रदीर्घ काळापासून गझल क्षेत्रात सक्रीय असून सुद्धा कधीच कुठलाच अभिनिवेश करताना दिसत नाहीत. पुढील पानांवर गझलकार श्री प्रफुल्ल कुलकर्णी यांचे मनोगत असू शकेल, असे वाटत होते पण गझलकार श्री प्रफुल्ल कुलकर्णी यांचे मनोगत मात्र कुठेही दृष्टीस पडले नाही. म्हणून पानामागून पाने उलटत गेलो तेंव्हा अगदी शेवटच्या पानावर छापलेला त्यांचा परिचय आणि छायाचित्राच्याही वर ....


गाथा बुडली...तरली, अवघे पाणी वाङ्मय झाले 

त्यातिल काही थेंबांपासुन माझ्या कविता झाल्या... 


असा ठाम विश्वास असलेल्या ओळी वाचल्या आणि हेच बहुधा जीवनात कायम आत्ममग्न राहणाऱ्या श्री प्रफुल्ल कुलकर्णी यांचे मनोगत असावे अशी मी माझ्या मनाची समजूत करून घेतली. 


मराठी गझलेच्या प्रांतात 'एक आणखी मजला' उभा करणाऱ्या गझलकार श्री प्रफुल्ल कुलकर्णी यांच्या घरचे वातावरण खूपच धार्मिक होते. नांदेड जिल्ह्यातील तळणी या अगदी लहानशा खेड्यात असलेल्या त्यांच्या घरात श्री दत्ताची पंचपदी व्हायची. घरासमोरच एक विठ्ठलाचे मंदिर होते. तिथे भजन, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम नेहमीच होत असत. त्यामुळे शब्द, ताल, लय व संगीत या सर्वांशी प्रफुल्ल कुलकर्णींचा अगदी लहानपणीच परिचय झाला. कानही तयार झाले आणि त्याबरोबरच अध्यात्मिक बैठक पक्की झाली.


'एक आणखी मजला' संग्रहातील गझला वाचायला सुरुवात केली आणि माझ्या मनात गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मला अचानकपणे मिळू लागली. गझल संग्रह कधी काढणार ? या माझ्याकडून सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला ... 


कसे या मनातील सांगू ? 

तुला मी कधीही कुठेही .... 


असे एका द्विपदीमधूनच उत्तर दिल्याचे मला जाणवले तर त्यापुढेच प्रफुल्लजी लिहितात की ....


अम्ही अक्षरांचीच केली 

गुलामी कधीही कुठेही ....


आणि 'एक आणखी मजला' ही तर जणू काही मराठी गझल प्रांतातली माझी फक्त सुरुवातच आहे असे सुचवत असताना...


खेळती रसिका तुझ्या परवानगीने 

कागदाच्या अंगणी काहूर माझे .... 


अशी आपली मानसिक अवस्था झाली असल्याचे प्रफुल्ल कुलकर्णी सांगत असावेत असे वाटून गेले, कारण...


भेटतो गझलेतुनी 

मी जसा आहे तसा ....! 


हे सांगत असतानाच अगदी स्वैरपणे, स्वच्छंदपणे भटकणा-या मनाच्या बाबतीत ....


जरा कासवाचे शिकावे 

मनाला हळू आत घ्यावे ....


असा सल्लाही ते देऊन टाकतात. आयुष्यभर कुठलाही मोह मनात न बाळगता, निरपेक्ष भावनेने विद्यादानाचे पवित्र कार्य करणारे गझलकार श्री प्रफुल्ल कुलकर्णी .... 


जगवण्याला उद्याची पिढी 

काळ मी वेगळा मागतो ...! 

कोण निर्मोहि आहे इथे? 

पिंडही कावळा मागतो ...!


असे सोदाहरण पण ठणकावून सांगतात. आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक संकटांना, दु:खद अशा घटनांना तसेच प्रचंड वेदनादायी अशा प्रसंगांशी दोन हात केल्यानंतर  ....


थांबना रे, जीवना, जाऊ उद्या  

आज थोडे वेदनांशी बोलतो ....! 


असे म्हणायची हिंमत फक्त प्रफुल्ल कुलकर्णी नावाचा माणूसच दाखवू शकतो असे मला वाटते. कारण, आपल्या ऐन उमेदीच्या काळात, फक्त ११ महिन्यांच्या अंतराने आपल्या आई-वडिलांचे छत्र गमावलेला हा मनस्वी कवी, त्यानंतर केवळ तीन वर्षांतच आपल्या सखीला सुद्धा दुर्दैवाने गमावून बसतो आणि आपल्या दोन चिल्ल्यापिल्लांची देखभाल, आई आणि बाप अशा दोन्ही भूमिका एकाच वेळी निभावतो हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तर आपल्या सोबत्यांबाबत बोलताना ...


सावल्यांचे भास माझे सोबती 

कोरडे आभास माझे सोबती ....

दु:ख माझे हेच की, माझ्यामुळे 

पोरके सौख्यास माझे सोबती .... 


अशा शब्दांत खंत व्यक्त करतानाही दिसतो, पण आपल्या जीवनात पाचवीलाच पुजलेल्या दु:खाशी पुन्हा एकदा नव्याने बोलण्याची इच्छा देखील व्यक्त करताना प्रफुल्ल कुलकर्णी म्हणतात ...


आनंद जीवनाचा चाखून पाहतो 

दु:खासवे नव्याने बोलून पाहतो ....

मुखपृष्ठ माणसाचे सुंदर दिसे जरी 

प्रत्येक पान त्याचे चाळून पाहतो .... 


असे स्पष्टपणे आणि मोठ्या धैर्याने सांगण्याची हिंमतही श्री प्रफुल्ल कुलकर्णीच ठेवतात असे जाणवते. इथल्या मातीशी असलेले आपले नाते आणि आपल्या सभोवतालच्या दुनियेबद्दल लिहिताना ....

मातीत उगवुनी येतो 

मातीतच देह मिसळतो .... 

दुनिया ना ज्याला कळते 

दुनियेस कुठे तो कळतो .... 


असे स्पष्ट मत तितक्याच परखडपणे मांडण्यासही श्री प्रफुल्ल कुलकर्णी अजिबात मागेपुढे पाहत नाहीत ....

मुलगी, मग ती कुणाचीही असो, तिच्या बापाचे एक सार्वत्रिक दु:ख व्यक्त करताना ...


पोरगी माझी चिपाडासारखी 

काळजी पण का पहाडासारखी ....

वेदनेची काळजी घेतो सदा 

औषधी, दुर्मीळ झाडासारखी .... 


ही मुलीच्या बापाची तसेच प्रत्येक पर्यावरणप्रेमी माणसाच्या मनात असलेली काळजी व्यक्त करताना दिसतात, तर त्याच वेळी .... 

जिथे ज्वालामुखी जागा 

तिथेही  रोप लावावे ....

थकूनी झोपता रस्ता 

धुळीचे  पाय चेपावे .... 


असा प्रेमाचा, माणुसकीचा, सेवाभावी वृत्तीचा व पर्यावरण रक्षणाचा मोलाचा सल्लाही ते देतात ....

मी झोपेला थोपटतो 

अन् स्वप्नांना जागवतो ....

थोडा थकवा अंथरतो 

साऱ्या चिंता पांघरतो  .... 


हे सांगायला तर ते विसरत नाहीतच. उलट आपल्या आयुष्यात असे अनेक अनुभव घेतल्यानंतर मग   .... 


मी तर होतो चक्क निरुत्तर 

मीच मला अनुभवल्यानंतर  .... 

जीन्स, फ्रीज, भातुकली खेळे 

रडे चूल, पोलके नि परकर  .... 


अशा शब्दांत समाजात घडत असलेल्या अनिष्ट तसेच चुकीच्या घटनांबाबत, समाजात पडत असलेल्या चुकीच्या व वाईट प्रथांबाबत आपली चीड, आपली खंत, आपली व्यथा ते मांडून जातात. अशाच अजून काही अनुभवांबद्दल आपल्या गझलांमधून केलेले भाष्य वाचल्यानंतर रसिकांच्या भेटीस येते ती ....


शंभर मजले उतरुन आल्यानंतर कळले 

त्या मजल्यांवर एक आणखी मजला होता ....  


हा 'शीर्षक शेर' असलेली गझल ...! प्रत्येक वेळी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविकपणे होणारा आनंद त्या गोष्टीतले सत्य, तथ्य किंवा वास्तव समोर आल्यानंतर, आपल्याला अतिशय वाईट वाटते. शंभर मजले उतरून आल्यानंतर झालेला आनंद, ह्या इमारतीला आणखी एक म्हणजेच १०१ वा मजला होता हे कळाल्यावर खरे तर मावळून जायला हवा, पण मग त्याच '१०१व्या मजल्यास' हा संग्रह अर्पण करण्याच्या श्री प्रफुल्ल कुलकर्णी यांच्या कृतीमधूनच त्यांचे वेगळेपण दिसून येते हे मात्र नक्की ....!   

मराठवाडा गझल मंच,औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) द्वारा आयोजित गझल मुशायरा आणि बैठकीत सहभागी होण्यासाठी ते दरमहा नांदेड येथून औरंगाबादला येत असत. मराठवाड्यात गझल चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी स्थापण करण्यात आलेल्या मराठवाडा गझल मंचचे ते सहसचिव होते.  गझलेने मला नाव आणि प्रतिष्ठा मिळवून दिली असे ते मोठ्या अभिमानाने सांगतात. गझलसागर प्रतिष्ठान, मुंबई द्वारा आयोजित पहिल्या अ. भा. मराठी गझल संमेलनामुळेच मी खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आलो असे मनापासून कबूल करतात. कारण त्या संमेलनातील मुशायरासाठी ते मराठवाड्यातील एकमेव निमंत्रित गझलकार होते. प्रफुल्ल कुलकर्णी हे इंग्रजी भाषा शिक्षक असून, इंग्रजी कवितांमुळे तसेच आनंद बक्षी, साहिर लुधियानवी, शकील बदायुनी, मजरुह सुलतानपुरी व हसरत जयपुरी या पाच गुरूंचा आपल्यावर प्रचंड प्रभाव असून त्यांची खूप गाणी ऐकली आहेत. तसेच कविता हा आपला आवडीचा विषय असून 'गीतकार होण्याचे आपले स्वप्न होते' असेही ते सांगतात. या पंच-गुरूंशिवाय इंदिवर यांचाही प्रभाव त्यांच्यावर इतका झाला आहे की त्यांनी आपल्या मुलाचे नाव देखील 'इंदिवर' असे ठेवले आहे.

या गझल संग्रहात एकूण ६६ गझलांचा समावेश  असून मेनका, आनंदकंद, प्रमीला, सौदामिनी, महामाया, विद्युल्लता, भुजंगप्रयात, कादंबरी, मंजुघोषा, व्योमगंगा, सुकामिनी, गांधर्वी, वीरलक्ष्मी, वियद्गंगा ही अक्षरगण वृत्ते तर रसना, उद्धव, अचलगती, चंद्रकांत ही मात्रावृत्ते गझलकार श्री प्रफुल्ल कुलकर्णी यांनी चांगल्या प्रकारे हाताळली आहेत असे दिसून येते. शिवाय 'नृपात्मजा' या वृत्तात एक गझल लिहिली असल्याचे तसेच एक नवीन वृत्त श्री प्रफुल्ल कुलकर्णी यांचेकडून तयार झाले असल्याचे व त्याला मी 'सुरमणि' असे नाव दिले आहे असे आद्य मराठी गझलकारा व मराठी गझलच्या छंदशास्त्राच्या अभ्यासक सौ संगीताजी जोशी (पुणे) यांनी आपल्या प्रस्तावनेत नमूद केलेले आहे. 


ह्या गझल संग्रहाचे मुखपृष्ठ सुंदर अशा रंगसंगतीमुळे आकर्षक झाले असून मलपृष्ठावर हाच 'शीर्षक शेर' उतरत्या पायऱ्यांच्या चित्रासारखा दाखवून, वरच्या बाजूस गझलकार श्री प्रफुल्ल कुलकर्णी यांच्या छापलेल्या छायाचित्रामुळे संग्रह वाचकांचे लक्ष वेधून घेतो एवढे मात्र नक्की ...!


१९८५ पासून कविता व १९८६ पासून गझल लेखन करणाऱ्या प्रफुल्ल कुलकर्णी यांच्या गझला कविताश्री, कवितारती, म.टा., लोकसत्ता, सकाळ आदि प्रकाशनांमधे तसेच प्रातिनिधिक संग्रहांमधे प्रकाशित झाल्या असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या एका गझलचा समावेश करण्यात आला आहे.  शिवाय 'मराठवाड्याची मराठी गझल' हा मराठवाड्यातील गझल चळवळीचा आढावा घेणारा एक विस्तृत असा लेखही त्यांनी लिहिलेला आहे. त्यांचा 'यात्री' नावाचा एक कविता संग्रह देखील प्रकाशित झालेला आहे. 

गझलेला आवश्यक असलेल्या सर्व गुणांचा समावेश असलेल्या गझला, अनेक काबिले तारीफ शेर यामुळे हा गझल संग्रह दर्जेदार, वजनदार तर झाला आहेच पण पुस्तकाच्या पुठ्ठा बाईंडिंगमुळे या संग्रहाला आणखीनच 'जडपणा' झाला आहे असे सुद्धा मला वाटते. 


आयुष्यात अनंत दु:ख भोगावे लागलेल्या आणि तरीही आपल्या झुबकेदार मिशांमधून दिलखुलास  असे हास्य चेहर्‍यावर कायम उमटवणाऱ्या माझ्या या मित्रास 'एक आणखी मजला' या गझल संग्रहासाठी शुभेच्छा देतो आणि आता अनेक अनेक गझल संग्रह लवकरात लवकर येऊ देत अशी मित्रत्वाची विनंती करतो.

..............................................

'एक आणखी मजला' (गझल संग्रह ) गझलकार :  प्रफुल्ल कुलकर्णी 

प्रकाशक :  स्वयं प्रकाशन, सोपाननगर, सासवड (पुणे) 

मुखपृष्ठ  :   संतोष धोंगडे, पुणे 

मूल्य   :   ₹ २००/

No comments:

Post a Comment