तीन गझला : विनोद देवरकर





१.


रोज घोटाळा नवा बघ गाजतो आहे

कर्जबुडवा पण सुखाने नांदतो आहे


आपुल्यांचा तोडला विश्वास त्यांनी अन्

अंगणी त्यांच्याच पडघम वाजतो आहे


खंजिरा जमलेच नाही; ना सुऱ्याला, मग

कोण केसाने गळा हा कापतो आहे?


युद्धनीती राहिली ना नीतिमत्ताही

आड शुरांच्या शिखंडी हासतो आहे


आमिषाने आंधळे केले असे काही

डोळसांना सूर्य काळा भासतो आहे


मौन आहे लोकशाही त्या निकालावर

निरपराधी आज शिक्षा भोगतो आहे


२.


तेलमीठ खात माणसे

मारतात लाथ माणसे


नाळ जोड पण जपून रे

टाकतात कात माणसे


भरजरी दिसायला जरी

नागडी मनात माणसे


भूक वाढली किती तुझी?

कोंबतोस आत माणसे


शांत भासती वरून पण

क्रूर ती मनात माणसे


चॉकलेट देवुनी कशी

लाज सोडतात माणसे


प्रेम, भूक, लाच वा नशा

एक तीळ, सात माणसे


३.


तुझ्या कोत्या मनाचे थांबवावे तू प्रसारण

कशाला ओढतो मैत्रीत जातीला अकारण


कुणी ओवाळतो जीवा, कुणी करतोय अर्पण

कधी ना आड प्रेमाच्या करावे राजकारण


किती मागेपुढे करशील त्या प्याद्यास वेड्या

जपावे त्यास तू अथवा ठरे हरण्यास कारण


प्रयत्नांची पराकाष्ठा, इथे केल्यावरी तू 

अपेक्षा वांझ उदरीही फळावे गर्भधारण


अहिंसेच्या ठरावावर तुला मिळतील युद्धे

जगी शांती हवी तर ठेव तू हिंसाच तारण

...................…........................

विनोद देवरकर, उमरगा 

मो. ९४२१३५५०७३

1 comment: