समृद्ध मनुष्य, समाज निर्माण करणे, हे आंबेडकरी साहित्याचे ध्येय आहे. आणि या ध्येयासाठी आंबेडकरी साहित्य कटिबद्ध आहे. आंबेडकरवादी साहित्य हे विश्वाच्या दुःखाचे व दुःख मुक्तीचे अत्यंत प्रभावी शस्त्र आहे. काळजात वणवा व विद्रोहाचा झुंजार आणि परिवर्तनवादी, समतावादी दृष्टीने लेखणीतून शाश्वत मूल्ये मांडणारे साहित्य म्हणजेच आंबेडकरवादी साहित्य होय. हे साहित्य विश्व साहित्य ठरलेले आहे. आंबेडकरी साहित्यातून शोषित, पीडित, वंचित घटकांचे दुःख, दारिद्र्य, वेदना, व्यथा, यातना, शोषण याचे यथोचित रेखाटन साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून केलेले आहे. त्याच शृंखलेतून आंबेडकरी कवी, गझलकार माननीय अरुण विघ्ने सर यांनी 'नभाला भिडावे,निळ्या पाखरांनी' या गझल संग्रहातून सबंध शोषणमुक्तीचे आणि मानवमुक्तीचे गीत, गझल निर्मिती केलेली आहे. आहे. गझल हे सर्वसामान्य माणसाच्या उत्थानासाठी परिवर्तनासाठी व सर्वव्यापी मानवाचे कल्याण होईल यासाठीच अनेक गझलकारांनी गझलेतून आंबेडकरवादी विचारधारा घेऊन गझलेचा प्रवास हा अविरतपणे सुरू केलेला आहे. आंबेडकरवादी गझलेचा प्रवास हा पुढे पुढे सरकत आहे. गझलेतून मानवीमूल्य, जीवनमूल्य जगण्याची ऊर्जा दिसून येत आहे. आंबेडकरवादी मानवी मूल्ये अरुण विघ्ने यांच्या गझल संग्रहात अविष्कृत होताना दिसतात. आंबेडकरी साहित्य प्रांतात परिचित असलेले नाव. अरुण विघ्ने सर यांचे प्रकाशित पाच कवितासंग्रह आहेत. 'मी उजेडाच्या दिशेने निघालो आहे', या कवितासंग्रहानंतर अरुण विघ्ने सर यांची उंच भरारी ही 'नभाला भिडावे, निळ्या पाखरांनी' उत्तुंग निळया पाखंराची भरारी ही आंबेडकरी प्रेरणेतून निर्माण झालेली आहे असं मला वाटते. ज्येष्ठकवी, गझलकार अरुण विघ्ने हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. नुसते कवी, गझलकार नसून समीक्षाच्या क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा हातखंडा आहे. एक समीक्षाग्रंथ निघेल एवढे समीक्षापर व्यापक लिखाण त्यांनी केलेले आहे. त्यांचा वाचनाचा व लिखाणाचा आवाका खूप मोठा आहे. चळवळीची तळमळ त्यांच्या प्रत्येक लिखाणातून जाणवते. अरुण विघ्ने सर यांच्या गझल संग्रहातील पहिलीच गझल 'निळ्या पाखरांनी' यात ते म्हणतात -
'नभाला भिडावे निळ्या पाखरांनी, नवे गीत गावे निळ्या पाखरांनी,
उपाशी रहा पण पुरेशे शिकावे, समजदार व्हावे निळया पाखरांनी'
अतिशय आशावादी गझल, आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य निळया आंबेडकरी पाखरांमध्ये निर्माण व्हावे आणि त्यांच्यात शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारी महत्त्वाची गझल आहे.
'मी शोधले तयांना नाराज कोण होते?,
मी बोलताच त्यांनी शब्दात गार केले'
(माझ्याच माणसांनी पृष्ठ-२२)
अशीच माझ्याच माणसांना शोधणारी ही गझल अरुण विघ्ने यांच्या गझलेने वामनदादा कर्डक यांच्या गझलेची मला आठवण होते.
'आहे सारेच इथे, माणसांची वाण आहे,
आहे वामन तुलाच, आज असे भान आहे'
पुढे गझलकार अरुण विघ्ने 'संविधान आहे ' या गझलेत म्हणतात -
'नांदोत न्याय, समता अन् बंधुभाव येथे,
भवितव्य भारताचे देदीप्यमान आहे.
हे संविधान अपुले रक्षा करू तयाची,
एकेक पान त्याचे तर मूल्यवान आहे.. '
भारताचे संविधान सर्व नागरिकांना स्वातंत्र्य म्हणजेच जगण्याचा मूलभूत अधिकार बहाल करते. भारतीय संविधानात सर्वोच्च हक्काची, अधिकाराची आणि सर्वाच्या सर्वांगीण विकासाची तरतूद भारतीय संविधानात करण्यात आली आहे. संविधानाने भारतीय समाजातील उच्चनीचता मोडीत काढून सर्वांना समान पातळीवर आणले आहे. शतकानुशतकाची विषमता समूळ नष्ट केली आहे. म्हणूनच संविधानातील एकेक पान मूल्यवान आहे , हेच गझलकाराला सांगावेसे वाटते आहे. संविधानाने स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता ही जीवनमूल्ये सर्वसामान्यांना बहाल केली. असे जरी असले तरी आज देशाच्या भारतीय प्रजासत्ताकाच्या ७५ व्या वर्षात आम्ही भारतीय झालोच नाही, त्याची प्रकर्षाने जाणीव होत आहे, तरीही गझलकार हे अत्यंत प्रामाणिक निष्ठावादी, लोकशाहीवादी विचाराचे असल्याने व संविधानावर अगाढ निष्ठा असल्याने त्यांच्या गझलेतून संविधानाची मौलिकता महत्त्वपूर्ण ठरते.
'घटनेस बदलण्याचा त्यांनी प्रचार केला,
सूर्यास झाकण्याचा नाहक प्रकार केला
नादान माणसांनी झाडास लक्ष्य केले,
एल्गार सावल्यांनी तेव्हा सुमार केला'
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व कवी गझलकारांच्या भावविश्वाचे निर्माते आहेत आणि महानायकही आहेत. परंपरावाद्यांना शह देत व्यवस्थेविरुद्ध आपल्या गझलेतून एल्गार पुकारला. पुढे कवी गझलकार अरुण विघ्ने म्हणतात -
'जात नावाची भयंकर ही बिमारी होत आहे,
कालचे चवदार पाणी हे विषारी होत आहे'
आजही पाणी पिल्याने बालकाचा प्राण जातो,
वंचितांच्या शिक्षणाची का शिसारी होत आहे'
(कालचे चवदार पाणी)
या देशातील समाजाला मानवी मनाला या जातिव्यवस्थेने पोखरून काढलेले आहे. जातिव्यवस्थेमुळे अनेक समस्या ,जाती-जातीत माणसाचे विभाजन कसे होत गेले आहे, माणूस माणसापासून दूर होत आहे, जातीमुळे माणसांचा विकास खुंटत आहे, जाती नावाच्या किडीला व मानवतेला कलंकित करणारे कौरप्य जिथे जिथे असेल तिथे तिथे आंबेडकरवादी विचार प्रहार करेलच मग ते कवितेतून असो, इतर साहित्यातून असो, गझलेतून असो. जातिव्यवस्थेचे हे आक्राळविक्राळ विघातक स्वरूप लोकशाहीस अत्यंत मारक आहे. या देशातील समाज व्यवस्थेत जात जाणिवा इतक्या घट्ट झाल्या आहेत की, अन्य कोणतेही क्षेत्र असो एक जात दुसऱ्या जातीविरुद्ध दंड थोपटून उभी टाकलेली दिसते आहे. ही जातिव्यवस्था व्यक्तिविकासाला खुंटविण्याची प्रक्रिया करीत आहे. आणि म्हणूनच आंबेडकरी साहित्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रेरणेने जातिविहीन समाज निर्मितीची बांधणी करीत आहे. भारत नावाच्या सुंदर संविधानिक देशाचे सोने करण्याऐवजी त्यांचे केवळ हिंदू राष्ट्र करण्याचा या व्यवस्थेने घाट घातला आहे. बहुजनांनी शिक्षण घेतले पाहिजे पण आज वंचितांचे शिक्षण या व्यवस्थेला शिसारी होत आहे. बहुजनांना शिक्षणापासून ही व्यवस्था वंचित करू पाहत आहे व म्हणूनच अरुण विघ्ने यांची गझल अतिशय जबाबदारीने या व्यवस्थेवर प्रहार करते. 'कोंडमारा' या गझलेतून अरुण विघ्ने म्हणतात -
'पाणी पिण्यास नुसता नव्हता लढा तळ्याचा,
काळास अस्मितेचा होता खरा इशारा
"आयुष्यभर स्वतःच्या पोटास मारुनीया,
चोचीमध्ये पिलांच्या केला प्रदान चारा'
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचा जो संगर पेटविला होता तो केवळ पाण्यासाठीचा नव्हता तर तो अखिल मानव हा समान आहे. हा लढा मानवमुक्तीचा, स्वाभिमानाचा, अस्मितेचा, महाडच्या संघर्षाचा लढा होता. शेकडो वर्षे संत, समाज सुधारक, क्रांतिकारकांच्या भूमीत माणसांना माणूस म्हणून जगण्याची मुभा मिळू नये, माणुसकीचे साधे अधिकार नाकारले जावेत. कुत्र्यामांजरापेक्षाही हिन वागणूक मिळावी, निसर्गदत्त पाण्यावर सर्वांचा अधिकार असताना घोटभर पाण्यासाठी तहानेने टाहो फोडावा, तडफडून मरावं, भीक मागावी, याचना करावी, अशा धर्मांध अमानुष विषमतेच्या विरोधात पसाभर पाण्यासाठीचा महाडच्या चवदार तळ्याचा संगर जगाचा इतिहासात अजरामर ठरला. पुढे अरुण विघ्ने सर एका गझलेतून म्हणतात -
'चार पायावर उभी ती वंचितांचा प्राण आहे,
संविधानी अर्थ शोधा काय आहे लोकशाही'
(काय आहे लोकशाही?)
लोकशाहीची जागा हुकूमशाहीनी व दडपशाहीनी घेतलेली आहे. सरकारकडून व सत्ताधाऱ्यांकडून हा देश संपून टाकण्याचे षडयंत्र सुरू आहे. संविधानाने लोकशाहीचे चार प्रमुख स्तंभ दिलेले आहेत. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका व प्रसार माध्यम ही प्रमुख स्तंभे भारतीय लोकशाहीची आहेत. पण या चारही स्तंभांना हतबल करून ते मोडकळीस आणण्याचे काम सुद्धा या देशात सुरू आहे. भारतीय संविधानाने आपले हक्क अधिकार बहाल केले आहेत ते गोठविण्याचे काम सुद्धा आज इथल्या व्यवस्थेकडून होत आहे. न्यायपालिका लोकशाही व्यवस्थेचा प्रमुख आधारस्तंभ आहे. भारतीय संविधानाने लोकशाही प्रक्रियेत न्यायालयाला उच्च स्थान दिले, लोकशाही संवर्धनाची जबाबदारी सोपविली आहे. पण धर्मांध व्यवस्थेवर जरब बसवून संविधानिक मूल्यव्यवस्था बळकट करणे काळाची गरज आहे.
'रक्षकांनी आज आता रक्षणाचा ध्यास घ्यावा,
वंचितांच्या जीवनाची साय आहे लोकशाही'
समाजातील विषम व्यवस्था विकृत मानसिकतेला जाळण्याची आणि संविधानाच्या रक्षणाचे दायित्व आमचे आहे, ही बाब लोकांनी जाणून घ्यावी. यासाठी जनप्रबोधन करणे आवश्यक आहे. संविधानाने दिलेला हक्क आमच्याकरिता सर्वश्रेष्ठ असून त्या हक्कांचा सद्सदविवेक बुद्धीने उपयोग करूनच संविधान आणि लोकशाही जिवंत राहू शकते हे जनप्रबोधन आपल्या गझलेतून गझलकार अरुण विघ्ने सर हे प्रकर्षाने करताना दिसतात व व्यवस्थेवर गझलेतून प्रहार करताना दिसतात -
'मोतिबिंदू अता काढले पाहिजे, दोगले चेहरे वाचले पाहिजे'
(मोतिबिंदू)
या गझलेतून वर्तमानातील दुटप्पी चेहरे आणि त्या त्या चेहऱ्यातून वाढणारी, असमानतेची दरी समजून घेतली पाहिजे. या दुहेरी भूमिकेतून अध्यातमध्यातच्या प्रवासातून चालणाऱ्या दोगल्या चेहऱ्यापासून सावध असलो पाहिजेत, आपले कोण आणि परके कोण? हेही पडताळून पाहिले पाहिजे असा इशारा 'मोतिबिंदू' या गझलेतून गझलकार देतात -
'माय माझी रमा बाप माझा भिवा, कार्य त्यांचे तुम्ही जाणले पाहिजे'
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई या सांस्कृतिक आई-बापाच्या जीवन संघर्षाची महती, त्यांचे कार्य सदैव आपल्या स्मरणात ठेवून बाबासाहेबांच्या चळवळीला वाहून घेतले पाहिजे. सांस्कृतिक माता रमाई यांचे कार्य त्यांचा त्याग समर्पण व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी केलेला संघर्ष याची जाणीव समाजातील सर्व घटकांनी ठेवली पाहिजे. या महामानवाचे कार्य आम्ही जाणले पाहिजे असे गझलकरांना या ठिकाणी सांगावसं वाटते.
'होत आहे रोज हल्ला या घडीला हादरे बसतात हल्ली चळवळींला'
(चळवळीला हादरे)
यातून वर्तमानातील भयावह स्थितीबद्दल अरुण विघ्ने सर आपल्या गझलेतून सांगतात. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मानवीमूल्ये कशी पायदळी तुडविल्या जात आहेत, रोजचे संविधानावरील हल्ले, विदारक परिस्थिती दिसून येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा या राजकिय, सामाजिक, सांस्कृतिक ,धार्मिक चळवळी सशक्त उभ्या राहिल्या असत्या तर चळवळीला असे हादरे बसले नसते आणि चळवळीला प्रतिगाम्याकडून हल्लेही झाले नसते. आज घडीला चळवळीवर जे हल्ले होत आहेत, त्यातून गझलकार, कवी मनाचे अरुण विघ्ने अस्वस्थ होत आहेत.
गझलकार अरुण विघ्ने सरांना सुरेश भट, वामनदादा कर्डक, प्रमोद वाळके सर, कविवर्य भाऊ पंचभाई यांचा सामाजिक वैचारिक गझलेचा वारसा लाभलेला आहे. भाऊ पंचभाई एका गझलेत म्हणतात -
'काही न बोलताही भरले उगाच डोळे
वाटेत दुःखितांचे झरले उगाच डोळे'
यातील 'डोळे' हा रदीफ खूप काही सांगून जातो. अशाच प्रकारच्या गझलांतून अरुण विघ्ने आपल्या गझला समृद्ध करीत आहेत.
महात्मा ज्योतिबा फुलेंनी मराठी ग्रंथकार सभेस लिहिलेल्या पत्रातून, साहित्यात मांडलेल्या विचारातून, कृतीतून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साहित्यिकांना दिलेल्या संदेशातून त्यांच्या मानवमुक्तीच्या क्रांती लढ्यातून हजारो वर्षाच्या गुलामाला माणूस म्हणून जगण्याची, स्वाभिमानाने जगण्याची आत्मप्रतिष्ठा मिळवून दिली. त्यासाठी आपले अवघे आयुष्य एकूण सर्व हारा वंचितांच्या उन्नतीसाठी आणि राष्ट्राच्या राष्ट्रनिर्मितीसाठीच वेचले. त्यांच्या या क्रांतिकारी प्रेरणेतून झिडकारलेल्या, नाकारलेल्या माणसानी 'नभाला भिडावे, निळ्या पाखरांनी' या गझल संग्रहातून गझलकार कवी अरुण विघ्ने यांनी उद्गार मांडलेला आहे. अज्ञान, अंधश्रद्धेचा अंधकार नाहीसा होऊन इथला माणूस समतेच्या वाटेने उत्कर्षाचा, प्रगतीचा, विकासाचा मार्ग अनुसरावा. हा देश माझा आहे, प्रथम मी भारतीय आहे व अंतिमही भारतीय आहे, माझ्या देशभक्तीबद्दल कुणालाही संदेह नसावा. ही मनोभूमिका घेऊन कवी अरुण विघ्ने सरह गझलेतून व्यक्त होत आहेत. कुठल्याही पूर्वग्रहदूषितांच्या फूटपट्ट्या न लावता होरपळणाऱ्या माणसाच्या आक्रंदनाचे, सहवेदनेतून आपण स्वागत कराल. एकूणच हा गझल संग्रह वैचारिक पातळीवर अतिशय वाचनीय आशय गर्भित, विचारगर्भित असाच आहे. या गझल संग्रहात दोन शब्दांची भूमिका मांडताना अरुण विघ्ने सर म्हणतात.. गझलेच्या शाळेतील अजूनही मी बालवाडीचाच विद्यार्थी आहे. यावरून त्यांच्यातले आंबेडकरी मोठेपण दिसून येते. गझलसंग्रहाला सांगलीचे गझलकार मा.सिराज शिकलगार यांची दर्जेदार प्रस्तावना लाभली आहे. ते प्रस्तावनेत म्हणतात, 'गझल हा प्रकार वृत्तबद्ध, तांत्रिक प्रकार असून कमी शब्दांत मोठा विषय हाताळण्याची क्षमता असणारा काव्यप्रकार आहे. एका कवितेएवढा खयाल गझलेच्या दोन ओळीच्या एका शेरामधून प्रकट करता येतो. गझलेत वर्णनपरता ,अलंकारिक भाषा, काल्पनिकता वगैरे बाबींना फारसे महत्त्व नसते. वास्तवाशी भिडणारे खयाल निवेदनशैली या बाबी गझलेमध्ये महत्त्वाच्या असतात.'
या गझल संग्रहात ७६ गझल समाविष्ट असून पान क्रमांक ८४ ते८६ वर गझलकारांचा संपूर्ण परिचय, साहित्य आवड, साहित्यातील योगदान, गझलकारांचे कविता संग्रह प्रकाशित आणि त्यांना मिळालेले १४ पुरस्काराची यादी दिलेली आहे.
हा गझल संग्रह गझलकार अरुण विघ्ने यांनी आई-वडिलांच्या पवित्र स्मृतीस व समस्त गझलकारांना समर्पित केलेला आहे. 'नभाला भिडावे, निळया पाखरांनी' या गझल संग्रहास निळ्या पाखरांचा थवा असलेले मुखपृष्ठ विशेष आकर्षित आहे. तसेच या गझल संग्रहात 'माती महान आहे' , 'जगणे विशाल झाले', 'रोकड सवाल आहे', 'मी फाटकाच आलो..!' , 'अंदाज पावसाचा', 'बोचरी वेदना', 'आशा मनात ठेवा' अशा अनेकविध भावस्पर्शी, वास्तवाशी भिडणाऱ्या, संवेदनशील गझला समाविष्ट आहेत. तसेच सांगलीचे बाजीगर प्रकाशन यांनी गझल संग्रह प्रकाशित केला आहे. भागवत बनसोडे यांची पाठराखण या गझल संग्रहाला लाभल्याने या गझलसंग्रहांची उंची व मोल अधिक वाढलेले आहे. एकूणच वाचनीय असा गझलसंग्रह असून पुनश्च गझलकार, कवी अरुण विघ्ने सर यांचे अभिनंदन व गझल संग्रहाचे स्वागत आणि सदिच्छा
............................................
प्राचार्य अस्मिताताई दारुंडे,
प्रबुद्ध नगर, हिंगणघाट, जि.वर्धा
८६६८५०३३०८

No comments:
Post a Comment