निसर्ग, धुकं, जलाशय..त्यात पडलेलं 'चेतनेच्या झाडाचं' प्रतिबिंब, आभाळातली देखणी चंद्रकोर असं समर्पक व उत्सुकतावर्धक मुखपृष्ठ आणि
मलपृष्ठावर ज्येष्ठ साहित्यिक, कवी अशोकजी बागवे यांची पाठराखण असलेला श्री.अशोक गुप्ते यांचा 'हे झाड चेतनेचे' हा नवा कोरा गझल संग्रह वाचनात आला. राणी, पकू आणि डॉक्टर अनुज या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या त्यांच्या तीन उत्कृष्ट गजलांना हे पुस्तक अशोक गुप्तेजींनी अर्पण केले आहे.
'होते नांदत शब्दांचे गोड थवे येथे पूर्वी
सहजच ओळी सुचण्याचे उरले न ऋतू ते आता'
असे म्हणता म्हणता, जीवनातील संघर्ष, सुख-दु:ख, वेदना, जीवनाची अंतिम स्थिती, शेवट, सकारात्मकता, आशावाद, नात्यांतील विश्वास, फसवेपणा, खरे-खोटे, आनंद, संकटे, वास्तवता, माणुसकी, निसर्ग, नियती, प्रेम, भक्ती, ईश्वर, सण-समारंभ, प्रीती व स्वप्नभंग...इत्यादी अनेक विषयांवरील समृद्ध व सकस शेर असलेला इतका सुंदर एकूण एक्क्याऐंशी गजलांचा आविष्कार अशोकजींनी केला आहे!
असं म्हणतात, की वेदनेच्या मुळाशी कवितेचा जन्म होतो. 'सुखमें सब हैं साथी दु:ख में न कोई l'
'मला पाहता संकटी एकट्याला
झणी सर्व हे लोक कोठे पळाले?'
किंवा
'इथे पेरली मी बियाणे सुखाची
कसे तण असे वेदनेचे निघाले?'
किंवा
'गरज होती ज्याच वेळी एकटा होतो जगी
त्याचवेळी आप्त सारे दूर सारू लागले..'
अशा शेरांमध्ये गरजेच्या वेळी दूर पळून गेलेले नातलग, मित्र म्हणवणारे लोक जेव्हा आपल्याला एकटं टाकतात, तेव्हा होणारे एकटेपणाचे दुःख, वेदना या शेरांमध्ये अशोकजी चपखलतेने मांडतात.
'मागे वळून जेव्हा थांबून पाहिले मी
होतेच आपुले जे त्यांचाच वार होता'
आपलेच म्हणवणारे जेव्हा आपल्याला फसवतात, तेव्हा नात्यातील खोटा-पोकळपणा -
बाप आई सर्व नाती पार खोटी
बघ खऱ्याची अंत्ययात्रा ही निघाली
यासारख्या दमदार शेरात व्यक्त झाला आहे. प्रीतीच्या नशेत प्रियकर इतका गुंगतो की बाह्यजगाची पर्वा तो करत नाही. अशोकजी हेच पुढील शेरात लिहितात,
'नशा जीवघेणी तुझ्या कुंतलाची
इथे गुंततो मी तमा न जगाची'
किंवा
'अशी जवळ येतेस माझ्या सखे तू
जगातून साऱ्याच मी दूर होतो!'
अशा आशयाचा आणखी एक शेर पहा,
'मिसळती तुझे श्वास श्वासात माझ्या
कशाला करू काळजी मी जगाची?'
वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ प्रत्येकानेच केला पाहिजे; कारण मुलांना मोठं करताना त्यांनी किती खस्ता खाल्लेल्या असतात याची गणतीच नाही! यासाठी पुढील शेर बघा,
'ज्या दिव्यांनी वाट माझी सुकर केली
त्या दिव्यांना रोज रे सांभाळतो मी !'
आई-वडिलांप्रति मुलाची कर्तव्यभावना यातून प्रतित होते. पुढील पिढीने ह्या आदर्श मूल्याचा स्वीकार करावयास हवा, नाही का?
जीवनात आलेल्या प्रत्येक घडीशी संघर्ष तर करावाच लागतो तथापि तिचा आनंदही सकारात्मकतेने, समरसतेने, नियम पाळत घ्यायचा असतो. पुढील शेर पाहा..
'आनंद जीवनाचा घेण्यास ऐक माझे
झोकून दे तुला तू पण नियम पाळ काही'
आलेल्या संकटांची तमा न करता, कणखरपणे जीवनाची वाटचाल करावयाची असते असाच आणखीन एक शेर -
'दु:ख येवो संकटांची काळजी ना
रे अशोका ना कणा हा मोडलेला'
किंवा
'संकटे येवोत आता मज काळजी ना
आशिषाने रे टिकावे रोज माझ्या हास्य गाली'
किंवा,
'जगी वेदनांचा किती हा पसारा
चला या हसूया जरासे जरासे'
जीवन आहे तिथे दु:ख- वेदना आहेतच. त्यांचा बाऊ कशास करावा? आशेचा सूर कायम ठेवणारा हा सकारात्मक शेर बघा..
'पुढे काजव्याचे तिथे शेत आहे
प्रवासात मजला तमा ना तमाची'...
यात
'तम' आणि 'तमा' शब्दांचा किती सार्थ व समर्पक वापर केला आहे! गझलेचा अंत:स्थ बंध, तिची लय, अनुभवांची मांडणी, शब्दांचा चपखल , सार्थ व समर्पक वापर, आर्तविभोर भावदर्शन, अम्लान रूपसौंदर्याने नटलेली गझल सदर संग्रहात रसिक वाचकाला आनंद देत राहते. अशोकजींना अनुभव समृद्ध, वाङ्मयीन व्यापक दृष्टी लाभलेली आहे. तसा पिढीजात वारसाही त्यांना लाभलेला आहे.
आपण दरवर्षी वाढदिवस साजरा करत असतो पण खरंतर एकेका दिवसाने आपलं आयुष्य कमी कमी होत असतं..गझलकार हेच वास्तव पुढील शेरात मांडतात...
'ओवोनी मज माळेमध्ये मी मज ठेवत आहे
दुर्दैवाने रोजच मी त्यातूनी गळतो आहे'
सारं माहीत असलं तरीही जगण्याचा हव्यास माणसाला सुटत नाही. हा शेर पहा..(पृ.४८)
'ना क्षणाचाही भरोसा माणसाचा
केवढा हव्यास पाहा या जिण्याचा'
जे सुपातूनी तुम्हाला हासती रे
अंत ठरलेला उद्या जात्यात त्यांचा!'
तरीही माणूस 'मी', माझे जपत अहंपणा सोडायला काही तयार नसतो ' अशोकजी लिहितात...
'मी मला माझे' कशाला हे पसारे?
सोड सारे अन् दिखावा मीपणाचा!
नग्न येशी नग्न जाशी हा कुढावे?
का धरावा मोह वेड्या भौतिकाचा?
जीवनाचं अंतिम सत्य सहजपणे, सार्थ शब्दांत मांडणं, तसेच विषयाचे वैविध्य ठेवून, सहजसुंदर शब्दगुंफण करत शेरांची निर्मिती करणं अणि गझलेचं हळवं विश्व आणि तिची नजाकत कायम ठेवण्याचं कसब गझलकाराला चांगलंच साध्य झालं आहे.
भोवताली घडणाऱ्या घटनांची जाणीव ठेवत, भावना, संवेदना, विचार आणि आठवणी यांची सुंदर रसदार, चवीष्ट फळे अशोकजींच्या या 'चेतनेच्या झाडावर' लगडलेली आहेत. रसिकांनी समरसतेने एकेक घास चघळून खातो त्याप्रमाणे एकेक शेर, एकेका गझलेचा चैतन्यमयी आनंद घ्यायचा. केव्हा भावविवश व्हावं तर केव्हा भूतकाळात फिरून, गतकारता अनुभवावी, तर केव्हा सामाजिक प्रश्नांनी विचारप्रवण व्हावं तर केव्हा स्रीविषयक समस्या, कोवळ्या कळ्यांवरील अत्याचारांनी अंतर्मुख व्हावं..
आणि शेवटी, गझलकार म्हणतात त्याप्रमाणे,
'निवळशंख झाला किती डोह सारा
तळाशी निमाला महागाळ आता'
आत्ममग्न व्हावं... नि:शंक होऊन, शांतश्चित्त व्हावं! चिदानंदात बुडून जावं..!
रसिक, गझल अभ्यासक यांनी हा संग्रह विकत घेऊन आपल्या संग्रही ठेवून गझलांचा आनंद नक्कीच घ्यावा.
..............................................
हे झाड चेतनेचे (गझलसंग्रह)
गझलकार-अशोक गुप्ते
संवेदना प्रकाशन, पुणे
मूल्य- रु. १५०/-

No comments:
Post a Comment