अंधकारातून प्रकाशाकडे नेऊ पाहणारी गझल : राजू गरमडे


 



गझलकार डाॅ.नंदकिशोर दामोधरे यांनी आपल्या गझलसंग्रहातून सामाजिक व्यवस्थेवर, शासनव्यवस्थेवर आणि माणसाच्या वृत्तीवर परखडपणे आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांना जे दिसलंय समाजामध्ये, चळवळीमध्ये वावरताना जे अनुभवयाला मिळालं तेच त्यांनी आपल्या गझलेतून मांडलेले आहे. माणसांविषयी, समाजाविषयी, शासनव्यवस्थेविषयी कोणताही द्वेष मनात न ठेवता अतिशय संयतपणे त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्धाचे विचारच आपलल्याला तारून नेणार आहेत यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.


या गझलसंग्रहामध्ये एकून ९६ गझला आहेत. मानवी समाजव्यवस्थेमधील विसंगतीवर आणि माणसाच्या स्वार्थीपणावर गझलेतून लिहिताना ज्या महापुरुषांनी आपलं अवघं आयुष्य समाजासाठी वेचलं त्याप्रति हा गझलकार कृतज्ञतेची भावना व्यक्त करत आहे. 'मी माणसात आलो' ही गझलही बाबासाहेबाचं ऋण व्यक्त करणारी आहे.


'मी माणसात आलो भीमा तुझ्यामुळे

मी मुक्त श्वास झालो भीमा तुझ्यामुळे


तू रोखल्या तुझ्या त्या बोटामुळे खरे

सूर्याकडे निघालो भीमा तुझ्यामुळे'


डाॅ. नंदकिशोर सरांची गझल सर्वसामान्य माणसांच्या उत्थानासाठी, त्यांच्या परिवर्तनासाठी संविधानिक मार्गाने वाटचाल करणारी, बहुजन समाजासाठी दीपस्तंभ ठरावी अशी आहे. असे गझलकार आपल्या मनोगतात गझलेविषयी लिहीत आहे.


'भरोसा ठेव माझ्यावर लढ्याला जिंकणे आहे

तुफानी वादळालाही उशाशी बांधतो आम्ही'


एक प्रकारे त्यांची गझल ही जीवनामध्ये लढायला लावणारी आणि संकटामध्येही प्रेरक ठरावी अशीच आहे.


आपला भारत हा विविध जाती, धर्म आणि पंथांमध्ये विभागलेला आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे तो राष्ट्रीयत्वाच्या भावनेने तो एकञ आलेला आहे. देशप्रेम, देशनिष्ठा आणि देशाविषयीची आपली कर्तव्ये ही जातिधर्मापेक्षा महत्त्वाची आहेत.

'मी भारतीय आहे' ह्या गझलेतून हाच आशय अभिव्यक्त होत आहे.


'मी भारतीय आहे इतकेच भान ठेवा

माझ्या शवाबरोबर हे संविधान ठेवा


असतील रंग न्यारे आपापल्या घरावर

माझ्या घरी तिरंगा फडकत निशान ठेवा'


भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांचा काळ लोटून गेला तरी आजही आपल्या देशामध्ये अनेक समस्याचा सामना करावा लागत आहे. गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार शिवाय अनेकांना राहायला घर नाही. उपासमारीने त्रस्त आहेत. कष्टकरी शेतकरी आत्महत्या करीत आहेत. देशाने अनेक क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती केली तरी आजही आपण काही बाबतीत पिछाडीवर आहोतच.

'उपासपोटी जगणार्‍यांच्या' या गझलेतूनही हेच भाव गझलकाराने व्यक्त केलेले आहेत -


'उपासपोटी जगणार्‍यांच्या प्रश्नावर ते बोलत नाही

तिळा तिळाने मरणार्‍यांच्या प्रश्नावर ते बोलत नाही


विकास झाला सांग कुणाचा शेतकर्‍यांचा कष्टकर्‍यांचा

पोट जगाचे भरणार्‍यांच्या प्रश्नावर ते बोलत नाही '


माणसाने नेहमीच माणसासारखे वागले पाहिजे. आपल्यामधल्या चांगुलपणाला आणि निस्वार्थीवृत्ती ठेवून इतरांना सहकार्य करीत राहिले पाहिजे. आपल्या स्वार्थापेक्षा समाजाच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे. 'राहू नकोस कुठल्या' या गझलेतून गझलकार हाच आशय मांडीत आहे -


'राहू नकोस कुठल्या वादात माणसा तू

जळशी उगाच जाती धर्मात माणसा तू


जन्मानुसार जर तू माणूस भेद करतो

माणुस म्हणून ठरतो अपघात माणसा तू'


बाबासाहेबांनी गुलामगिरीच्या अंधकारामध्ये खितपत पडलेल्या बांधवांना बाहेर काढून माणूस

 म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. नाही तर असंच जनावरासारखं आयुष्य त्यांच्या नशिबी आलं असतं. दारिद्र्याने, अज्ञानाने पिचलेल्या समाजाला अंधकाराच्या दलदलीतून बाहेर काढले.

म्हणूनच 'तू नसता तर' या गझलेतून बाबासाहेबाप्रति कृतज्ञता व्यक्त झालेली आहे.


'तू नसता तर जगणे मरणे कळले नसते

मानवतेचे संगर कुणीच छळले नसते


तू नसता तर सूर्यालाही जागच नसती

प्रकाशकिरणे गावकुसावर छळले नसते'


बाबासाहेबांनी संविधान लिहून सामान्य जनतेचे हितच साधलेलं आहे. समाजातील वर्गभेद, विषमता नष्ट करून समानता अस्तित्वात आणली. म्हणूनच भारतातला कोणीही व्यक्ती मोठ्या पदावर विराजमान होऊ शकतो.

'रक्तात भीम आहे' या गझलेतूनही हाच आशय व्यक्त होतो आहे.


'रक्तात भीम माझ्या श्वासात भीम आहे

प्रत्येक माणसांच्या घासात भीम आहे


बघ संविधान आहे माझ्या तुझ्या हिताचे

मानव सुखावयाच्या ध्यासात भीम आहे'


'माझ्या खरेपणाला' या गझलेतूनही समाजातील वास्तव परखडपणे गझलकारानी मांडलेले आहे. माणसाची संकुचित वृत्ती आणि समाजामध्ये नष्ट होत चाललेला आपलेपणाचा ओलावा ही समाजासाठी चांगली गोष्ट नाही. समाजामध्ये होत असलेला बदल हा गझलकारानी पुढील गझलेतून मांडलेला आहे.


'माझ्या खरेपणाला कुठलेच मोल नाही

बहुतेक माणसांच्या हृदयात ओल नाही


विद्रोह बोलल्यावर क्रांती घडून यावी

आता तसे डफावर उठणार बोल नाही'


डिऑन पब्लिशिंग हाऊस, नागपूरने अतिशय देखण्या स्वरुपात हा गझलसंग्रह काढलेला आहे. ज्येष्ठ गझलकार प्रमोद वाळके 'युगंधर' सरांची चितंनशील, गझलेचा तळ गाठणारी प्रस्तावना लाभलेली असून पाठराखन ज्येष्ठ गझलकार सुदामभाऊ सोनुले यांनी केलेली आहे.


...............................................

किनारे सरकत आहेत

(गझलसंग्रह )

 डाॅ. नंदकिशोर दामोधरे,

डिऑन पब्लिशिंग हाऊस,

प्रस्तावना : प्रमोद वाळके 'युगंधर'

पाठराखण : सुदाम सोनुले

मुखपृष्ठ : भाऊ दांदडे

पृष्ठे : ११२

मूल्य : ₹ १५०/-

No comments:

Post a Comment