विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो : सुनील बावणे

 



'जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही 

स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही 


फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे ?

घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही 


कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला 

तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही 


दिले प्रत्येक वस्तीला अम्ही आकाश सोनेरी 

जिथे जातो तिथे हाका उषेच्या वाटतो आम्ही 


जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा

विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही '


-- सुरेश भट


'आम्ही' या एका  सर्वांगीण शब्दातच सारं काही सार आहे आणि गहन गझलेतून गझलसम्राट श्री सुरेश भट साहेब यांनी एक, काव्याच्या माध्यमातून विशिष्ट जग निर्माण केलं आणि या जगाला एक असा काही संदेश या गझलेने दिला की ते हयात असताना किंवा नसताना आजही या गझलेचे रहस्य कितीतरी खोलवर गझल प्रेमींच्या गझल रसिकांच्या गझल अभ्यासकांच्या गझल ध्यासांच्या खोलवर हृदयात घर करून आहे. या सर्वसमावेशक शब्दांतच सर्वकाही सामावले आहे.

विविध अंगातून बघायला गेलं तर विविध विचारांतून, नजरेतून या गझलेचे विश्लेषण झालं असेलच आणि अनेक गझलकार साहित्यिकांनी या गझलेचे समीक्षण, विश्लेषण केलं आहे, करत सुद्धा आहेत. एक माझा छोटासा प्रयत्न असेल या गझलेचे विश्लेषण मी माझ्या साहित्य आणि साहित्यिक विचारातून करण्याचा छोटासा प्रयत्न आपल्यासमोर केला आहे.

खरं पाहता २००३ च्या पहिले व २००३ च्या नंतरचा काही काळ ते २०१८ पर्यंत ,,, या काळात गझल क्षेत्राशी तिळभरही संबंध नसलेला मी आज गझलेबद्दल बोलतो आणि पोटतिडकीने गझल शिकण्याचा किंवा गझलवर मंथन करण्याचा विचार करतो हे एक माझ्या मते चुकीचे धाडसही असू शकते किंवा माझा गझलप्रति लगाव, आवड सुद्धा असू शकते. वरील शेर हा जेव्हापासून मी या साहित्य क्षेत्रामध्ये वावरायला लागलो तेव्हापासून हा वरील शेर साहित्य क्षेत्राच्या मंचावर मोठ्या फलकांवर, हेडलाईनच्या रूपात ठळक अक्षरांत दिसायचा. तेव्हा एकच प्रश्न यायचा की हे काय आहे, या दोन ओळीत एवढं असं काय सामर्थ्य सामावलं आहे की, साहित्यिक, रसिक श्रोते त्याला वाचल्याशिवाय, आपल्या मनात गुणगुणल्याशिवाय राहू शकत नाहीत किंवा समोर जाऊ शकत नाही. पण नंतर नंतर जसं गझलेजवळ थोडं थोडं बसायला भेटलं, तेव्हा मात्र या गहन दोन ओळींचा अर्थ थोडाफार समजला आणि आता त्यावर भाष्य करण्याचे धाडस करतोय. खरंच श्री सुरेश भट साहेबांना शतशः सलाम. 


प्रचंड विरोध असताना सुद्धा आपली जमेची आणि सत्य असणारी बाजू आपला संयम कधीही न सोडून आणि आपलं लिखाण कधीही न भटकू देता, आपली गझल उदयास आणली आणि तिला ठामपणे प्रेक्षकांच्या समोर ठेवली आणि त्याच गझलेने विश्वव्यापकता धारण केली. मराठी गझलेत श्री सुरेश भट साहेबांच्या स्वरूपात गझलेचे साहित्यिक जग निर्माण केलं. विश्व व्यापलं. आज त्याचं महत्त्व आम्हा गझलकारांना कळून आले आहे. खंबीरता, सत्याची कास, परिस्थितीनुसार जगणं आणि जे पाहतो, ज्याच्या सानिध्यात येतो ते लिहिणं हेच खरं साहित्य, त्यांच्या साहित्याचे हेच खरं स्वरूप आज जगासमोर आलेलं आहे.


'जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही

स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही '


'आम्ही' साहित्यिक लेखक, कवी, विविध अंगी शब्दरूपी आपली शक्ती,  प्राणप्रतिष्ठा आपला आवाज आपल्या शब्दांतून आपल्या लेखन साहित्यातून उठवून जगामध्ये पसरलेले अतोनात दुःख, वेदना, नैराश्य माणसांच्या जीवनात आलेला अंधार, आणलेला वैचारिक अंधार, आर्थिक असहायता, भेदभाव अशा विविध अंगाने या जगात असलेले बिकट स्थितींना झिडकारून त्याला कुठेतरी बगल देऊन आम्ही साहित्यिक या जगामध्ये या मानव समाजामध्ये, मानवाच्या मनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये सुखाशी आनंदासी कसं जोडल्या जाईल त्याचं सर्वांगीण सांत्वन कसं केल्या जाईल, त्याच्या जीवनात सुखाचा काहीतरी अंश येऊन तो आपलं जीवनमान उंचावेल यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी,  टिकण्यासाठी आम्ही आमच्या सुखाशी सुध्दा भांडण करतो. आणि निव्वळ भांडण करत नाही तर, आमच्या वाट्याला आलेले दुःख शरीरावर प्रहार करणाऱ्या शत्रूचे वार झेलून तसेच शाब्दिक माऱ्याने आमच्या शरीरावर, आमच्या मनावर, आमच्या भावनावर पडलेल्या भेगांना जखमांना बाजूला करून दुःखाचा विसर करून, लपवून, झाकून आम्ही या मानवतेच्या महान सागरात माणसाला माणूस जोडण्याचं काम करतो आणि हे असे काम साहित्याच्या रूपात करण्यासाठी कितीतरी लिहिते साहित्यिक, हात एकवटले आहेत. हा असा प्रदीर्घ चालणारा लढा लेखकांच्या हयातीच्या काळापासून तर सोबत हातात हात घेऊन चालणारे आम्ही आमच्या समसाठी हे मौलिक भांडणे चालू राहील. आणि एक दिवस नक्की असा येईल की आम्ही यामध्ये माणसाला माणूस जोडण्यामध्ये आमचे दुःख लपवून, झिडकारून सुखाशी सहसंबंध प्रस्थापित करून माणसाला माणूस जोडण्याचं महान काम आम्ही करत राहणार आणि यापुढेही आम्ही असलो किंवा नसलो तरी येणारी भावी पिढी या साहित्यरुपी शस्त्रातून हे महान कार्य सतत करत राहील. आणि एक दिवस इथे अंधारातून प्रकाशच प्रकाश उदयास येईल. 

सुरेश भट साहेबांनी अतिशय गंभीरपणे आणि विचारपूर्वक नमूद केलेले आहे. वेळप्रसंगी शब्दमाऱ्यातून, शब्दातून  वाईट परिस्थितीशी आणि भेडसावणाऱ्या सामाजिक समस्यांशी आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांशी शब्दरूपाने दोन हात करण्याला सुद्धा आम्ही मागेपुढे पाहणार नाही. हा एक अनमोल संदेश भट साहेबांनी आपल्या या दोन ओळीतून दिलेला आहे, असंच म्हणावं लागेल.


'फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे?

घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही'


आमच्या सत्यतेने आम्ही कमावलं आहे, आमच्या शब्दांना फुकाच दिव्यत्व नाही. आमचे शब्द म्हणजे दिव्यत्व आहे, चिरकाल अशी रेघ आहे. आम्ही आमच्या विचारधारेतून, विचारसरणीतून एकेक शब्दांना धारदार करून जगाच्या पाठीवरील समस्यांना शब्दरूपी तोंड देऊन लढावयास सज्ज केले आहे. आणि त्या शब्दांना फुकटचा भावहिनतेचा स्पर्शही होणार नाही याची दक्षता घेऊन आम्ही आमचे शब्दरूपी शस्त्र घेऊन निघालेलो आहोत. आमच्या दिव्यरूपी शब्दांना खोट्यानाट्या भावनांचा कुठेही स्पर्शही झालेला नाही, अशी ही शब्दांची खाण घेऊन आम्ही निघालो असताना आम्ही आमच्या भावना, आमचे दुःख विसरून स्वतःच्या जीवनाची स्वतःच्या घराची स्वतःच्या महत्ततेची राख रांगोळी सुद्धा केली आहे आणि समोर सुद्धा सत्यासाठी येणारे शब्दांचे कफल्लक आपल्या घराची राखरांगोळी करून तीच राख कपाळावर माळून येणारी भावी पिढी सत्याच्या बाजूने नेहमी उभी असेल.  सत्याच्या बाजूने आमच्या शब्दांना मिळालेले दिव्यत्व कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी आमच्या विविध भावनांचा लढा उभारून आमच्या स्वप्नांची झालेली राख सदैव सत्याच्या बाजूने उभी असेल,  आणि 'त्या समाजाला' आमच्या शब्दांना कधीही कमी लेखू देणार नाही, शब्दांचा कधीही अपमान कुणी करणार नाही याची दक्षता घेण्यास येणारी पिढी ही सज्ज आहे.


'कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला 

तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही '


विठू माऊलीने आपले निजरूप पंढरपुरी या भागात प्रस्थापित केले आणि चंद्रभागा नदीचा काठ पावन केला. अशा ह्या चंद्रभागा आपल्या देशात असंख्य आहेत. पवित्र, पावन स्थळ चंद्रभागेच्या किनारी असलेले पंढरपूर येथे विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी चंद्रभागेच्या पाण्यामध्ये चंद्रभागेच्या सानिध्यात राहण्यासाठी लाखो भाविक पंढरपूरला जातात. श्रद्धेने या स्थळाचे महत्त्व वाढले आणि त्याच एका भावनेतून कवी म्हणतो की आम्ही लेखक, साहित्यिक पंढरी मोठ्या श्रीमंत अशा ठिकाणी लक्ष केंद्रित न करता आम्हाला आमचा साहित्यकृती झेंडा, आमचे साहित्य कुठेही न्या कोणत्याही नदीच्या काठावर न्या कोणत्याही परिस्थितीत सांगा, आम्ही आमच्या शब्दरूपी पोह्याने, शब्दरूपाने पछाडलेले वारकरी आपल्या शब्दाचा, आपल्या गझलेचा झेंडा जिथे रोवेल तिथे पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा येऊन गझलेच्या तल्लीनतेत  मग्न व्हावे लागेल आणि या गझल वारकऱ्यांसोबत या गझल पंढरीत वास्तव्य करावे लागेल. म्हणजेच आपले निजरूप तिथे सुद्धा दाखवावे लागेल. आम्ही आमचा साहित्याचा झेंडा रोवून दाखवूच. त्यासाठी जगातील कुठलेही उच्च स्थान, आमच्या साहित्याची पायरी बांधण्याजोगे आम्ही मानतो. साहित्याची ठेवण आणि साहित्याचे बीजारोपण करण्यासाठी कोणतीही नापीक जागा आम्ही आमच्या शब्दरूपी साहित्य पेरणीतून सुपीक करून दाखविण्यास आजची ही साहित्यिक पिढी तयार असेल.


'दिले प्रत्येक वस्तीला अम्ही आकाश सोनेरी 

जिथे जातो तिथे हाका उषेच्या वाटतो आम्ही'


या शब्दसंवगड्यांसोबत सुख वाटण्याच्या प्रवासात निघताना आम्ही साहित्यिक लेखकांनी अनेक सुख-दुःखाचा अनुभव घेतला. श्रीमंतासोबत गरिबीला अगदी जवळून पाहिले. चालत असताना अनेक वाटेमध्ये अडचणी आल्या. वाटेत येणाऱ्या प्रत्येक वस्त्या आम्ही अगदी जवळून पाहिल्या, पहात आलो त्यामध्ये काही सधन तर काही गरिबीच्या झळा सोसणाऱ्या वस्त्या ह्या शब्दसागराला दिसल्या आणि त्यातच, ज्या वस्त्यांना कधीही प्रकाश आणि सोनेरी पहाटेच्या सुखाचा अनुभव घेता आला नाही त्या अशा काळोखात निजपत पडलेल्या वस्त्यांना सुद्धा सोनेरी पहाट दाखविण्याचे, सुखाचे क्षण दाखविण्याचे काम केलेले आहे आणि ते निरंतर चालणार आहे. सुखमय जीवन, प्रकाशाच्या झोतात आणण्याचे  काम करत असताना जिथे जिथे आवश्यकता पडेल ज्या ज्या वस्त्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेता येईल त्या त्या वस्त्यांमध्ये प्रेमाचे, आपुलकीचे बोल देऊन त्यांना बोलतं करून, वस्त्यांना आवाहन करून प्रेमाने संवाद साधून हक्क देऊन नवाकिरणांच्या हाका दिल्या आहेत आणि आमचा असाच निरंतर प्रयत्न पुढेही चालू राहील. या प्रवासामध्ये जसा जसा हा शब्द मेळा मिळून काफिला समोर वाटेने जात राहील आणि वाटेत येणाऱ्या अंधकारमय अशा वस्त्यात प्रकाश पेरण्याचे काम आपुलकीच्या हाकेतून नवकिरणांच्या हाकेतून जाणिवेतून जागविण्याचे काम येणारी भावी पिढी नक्कीच करेल असा कवीला निश्चित विश्वास आहे.


'जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा

विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही' 


गझलसम्राट श्री सुरेश भट साहेबांचा यल्गार पुकारण्याचा काळ यल्गार लिहिण्याचा काळ साहित्यिक दृष्टीने अतिशय प्रबळ आणि श्रीमंतीचा काळ होता असं वाटते. साहित्य निर्मितीच्या या काळातही अनेक दिग्गज साहित्यांच्या  मधोमध एक दुफळी होती काय .... असा भास वाचनातून ,,, यल्गारातून येतोय‌. आणि ते सत्यही असावं कारण गझलेचा प्रदीर्घ प्रवास पाहता आणि आपल्या मराठीत गझल येईतोवरचा काळ पाहता श्री सुरेश भट साहेब हे गझलेचे नवीन विश्व घेऊन आले होते, हे कदापिही टाळता येणार नाही. निव्वळ निसर्ग, पानाफुलांत प्रेमाच्या छटात, भावनिक आधारात, नात्यात अडकून न राहता, जगलं ते लिहिलं... पाहिलं ते लिहिलं... भोगल ते लिहिलं... यावर त्यांचा विश्वास दिसतो आणि अशातच या दुफळी वातावरणात भट साहेबांना  आणि त्यांच्या गझलेला अनन्य महत्त्व प्राप्त झालं आणि त्यांच्यासोबत एक अशी काही लेखकांची, साहित्यिकांची एक प्रकारची फौजच तयार झाली की त्यांना म्हणावं लागलं 'जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही' त्या काळात जरी गझलेचा खास करून मराठी गझलेचा भट साहेबांच्या गझलेचा विरोध झाला... विरोध होत राहिला, त्या काळातही विरोधाला न जुमानता एका विशिष्ट प्रांतापुरती एका विशिष्ट वर्णीयापुरती किंवा एका विशिष्ट भागापुरती, एका समाजापुरती  गझल न राहता, ही सर्वसामान्यांचे बोलण्याचे ‌शस्त्र, माध्यम व्हायला पाहिजे आणि यातून असे गझलकार रचनाकार तयार व्हायला पाहिजे की जे या विधेचा प्रसार सर्वत्र करतील आणि गझल ही निवड शब्दरूपी रचना न राहता जीवन जगण्याची कला, जीवन जगण्याचा आधार, सत्याची समज,  समाजाचं देणं, कमी शब्दांत समाजाचं खरं स्वरूप मांडण्याची विधा बनेल हा भट साहेबांचा विश्वास होता. गझलेच्या उगवत्या काळात या विधेचा गझल गल्लीचा विरोध केला तरी येणारी भावी पिढी ही या गल्लीतील गझल समजणाऱ्या समोरून प्रशस्त मार्ग काढून लख्ख उजळून निघेल चकाकून निघेल... येणारी पिढी ही विजा घेऊन येणारी असेल आणि या विजेतून लख्ख प्रकाश प्रवाह सर्वोपरी प्रकाशित होईल की ज्यातून समाजाचं खरं स्वरूप रूप सामाजिकता, बंधुता, समानता याचे विचार एक गझल करेल आणि प्रत्येकाच्या मनामनात एक समाज प्रबोधनाचं काम गझल करेल. भावी पिढी त्यासाठी नक्कीच तयार होईल. गझल ही कुण्या एका ठिकाणी बंदिस्त न राहता ही सर्वत्र आपलं सर्वस्व प्रगट करेल आणि गझलकारांच्या,  साहित्यिकांच्या, स्वतःच्या मनावर अधिराज्य करेल असा विश्वास श्री सुरेश भट साहेब यांनी निश्चितच एका अढळ स्तंभासारखा रोवून ठेवला आहे, तो आजही गझेलेचा स्तंभ तसाच उभा आहे, तो उंच उंच वाढत आहे. त्याची उंची वाढविण्यासाठी भावी पिढीही सतत प्रयत्नशील आहे.

..............................................

No comments:

Post a Comment