१.
रफू करावे कसे मनावर, कुठे माहिती असते
सुईतल्या धाग्याला उत्तर कुठे माहिती असते
शांतीचा संदेश जगाला कसा द्यायचा त्याने ?
कावळाच तो, त्याला कबुतर कुठे माहिती असते
काना, मात्रा, वेलांटी मी ओळखतो आयुष्या
मधेच येणारे जोडाक्षर कुठे माहिती असते
बेघर वादळ बनून फिरतो मी माझ्या भवताली
धूळमाखल्या वाऱ्याला घर कुठे माहिती असते
समोर माझे मन दिसल्यावर सुख माघारी फिरते
पण दुःखाला हे कृष्णविवर कुठे माहिती असते
पुण्यामुंबईकडची कॉफी फारच कडवट असते
नगरकरांना नकली साखर कुठे माहिती असते
ज्ञात जगाच्या नवलाईची वाहव्वा जो करतो
त्याला अज्ञाताचे अंतर कुठे माहिती असते
बुरूज, खंदक, तटबंदी तर कोणालाही दिसते
भुयार किंवा हळवे तळघर कुठे माहिती असते
लोक बोलले म्हणून केवळ शायर नसतो कोणी
शिवा तुलाही गझल खरोखर कुठे माहिती असते
२.
तू ठरवशिल ते करू आपण
वाचलो तरिही मरू आपण
काळ भीती दाखवत आहे
चल जरासे थरथरू आपण
दुःख गायीसारखे असते
आणि असतो वासरू आपण
आपल्याला कैद केले तर ?
का धरावे पाखरू आपण ?
मी धुक्याची शाल मागवतो
ये कधीही, पांघरू आपण
पाकळ्या देवापुढे ठेवू
फक्त काटे कुस्करू आपण
आपली दानत घरी दिसते
एरवी गल्लाभरू आपण
ऐक त्यांची मागणी आधी
मग हवेतर ठोकरू आपण
तोल जाताना शिवा हसतो
आणि म्हणतो सावरू आपण
३.
आले किती गेले किती मोजायला सांगू नका
माझ्यातली वर्दळ कुणी रोखायला सांगू नका
शेकून झाल्यावर तरी सौजन्य थोडे दाखवा
माझ्याच अश्रूंनी मला विझवायला सांगू नका
बागांमधे ही टवटवी इतक्या सहज आली कुठे
आता फुलांना चेहरे झाकायला सांगू नका
अगदी जवळच्या माणसांनो एवढे ऐकाल ना
मन मारल्यावर भावना जगवायला सांगू नका
आकाश खाली यायलाही संमती देईल पण
त्यालाच सगळ्या पायऱ्या उतरायला सांगू नका
माझ्या व्यथांची स्मारके तुमच्या सुखांना दाखवा
पण एकही अक्षर तिथे कोरायला सांगू नका
दुनियेस मी दिसलो तरी कोषात राहू द्या शिवा
दोघातला पडदा मला हटवायला सांगू नका
..............................................

No comments:
Post a Comment