तीन गझला : आरती पद्मावार

  






१.


आजन्म गारव्याची झालास धून तू 

आलास वात बनुनी चोहीकडून तू


नाही गरज तरीही पडतोस पावसा 

बसलास ऐनवेळी होता दडून तू


उरली जमीन कोठे ओसाड मोकळी 

भिंती उभारल्यावर पाया रचून तू


वेगात वाढण्याची घाई किती तुला 

पडतोस फार लवकर मग उन्मळून  तू


होईल पान पिवळे केव्हातरी तुझे 

नियमानुसार अंती पडशिल गळून तू 


माणूस न्यून करुनी आतून माणसा 

अन् भांडतोस नुसत्या धर्मावरून तू 


मी पोचले खरेतर निव्वळ तुझ्यामुळे

होती दिशा दिलेली रस्ता बनून तू


झालास पायरी वा केव्हा शिडी उभी

नाही पडू दिले पण उंचावरून तू


मी मार्ग काढते मग गर्दीतुनी सहज

बघतोस वाट माझी जेव्हा दुरून तू


२.


विसावा घेत असते मी कितीदा थांबते क्षणभर

हवासा गारवा मिळतो तुझ्या छायेत आल्यावर


द्विधा आहे अवस्था ही कळत नाही कशी वागू

पुढे जाऊ, फिरू मागे अशा मी आज वळणावर


कधीही घेतले नाहीत उसने पंख कोणाचे

उडू शकले, गगन गाठत बरोबर कापले अंतर


तसाही फायदा नव्हता उगाचच पाझरुन तेथे

म्हणूनच काल केली मी मनाची पालथी घागर


तिची किंमत पुढे कळली निघाली नोट कामाची

समजला जो तिला होता कितीवेळातरी चिल्लर


श्रमाचे पेरल्यावर बी फळे येतीलही नक्की

म्हणूनच ठेवला आहे सतत विश्वास कर्मावर


गडद अंधारही मिटतो तिथे असण्यामुळे माझ्या

क्षणातच लख्ख उजळवते कुठेही 'आरती' अंबर


३.


गगनामधे गतीच्या करते विहार इच्छा 

फिरते सभोवताली होऊन घार इच्छा 


मोठे पहाड, डोंगर येताच अडचणींचे 

खोदत भुयार रस्ता करते तयार इच्छा


देऊन जन्म त्यांना जर फायदाच नव्हता

मारून टाकल्या मी गर्भात चार इच्छा 


बनली ठिबक कितीदा, केव्हा तुषार इच्छा

हिरवे करून गेली जीवन शिवार इच्छा 


होऊ दिलेच नाही बोथट तिला कधीही

मी ठेवली स्वतःची मग टोकदार इच्छा


नंतर मला समजले होती किती विषारी 

मारून डंख झाली होती पसार इच्छा 


होताच वेळ थोडा ऊर्जा निघून गेली 

झाली बऱ्याचवेळा मग थंडगार इच्छा 

..............................................

No comments:

Post a Comment