१.
पेरलेल्या या पिकाला भाव आहे का?
शेत कसणे हा जुगारी डाव आहे का?
प्रेम माया स्नेह सारा आटला आता
सांग पूर्वी सारखा तो गाव आहे का?
सांग मित्रा ढाळतो अश्रू असे का तू
काळजाला खोल तुझ्या घाव आहे का
काळजी नाही जराही दीन दुबळ्यांची
गावचा नक्की खरा तो राव आहे का?
उच्च काही शूद्र काही निर्मिले कोणी
ईश्वरापाशी दुजा हा भाव आहे का?
२.
पेटला जर आठवांचा जाळ मित्रा
काळजाला तू जरा सांभाळ मित्रा
कोणते कोठे कसे लावू ठिगळ मी?
फाटले आहे तुझे आभाळ मित्रा
देव आहे तो भुकेला भावनेचा
कर्मकांडाचे नको जंजाळ मित्रा
ती सुखाने नांदते आहे घरी त्या
भेटणे आता तिला तू टाळ मित्रा
झिजविला कष्टात ज्याने देह सारा
एकदा बापास त्या कवटाळ मित्रा
३.
माणसाचे पंख कोणी छाटले हो
भेद जातीचे कशाला थाटले हो
लाल आहे रक्त साऱ्या माणसांचे
स्पर्श होता माणसे का बाटले हो
ठेवला नेऊन कोठे देश माझा
फक्त त्यांनी श्रेय सारे लाटले हो
मित्र झाला एकटा आधार माझा
मेघ जेव्हा संकटाचे दाटले हो
कोण होती ती मला ठाऊक नाही
चित्र सुंदर एक मी
रेखाटले हो
...............................
सोपान ज्ञानोबा डोके
मो.9518707344
No comments:
Post a Comment