१.
गर्द सावली दिसे कुठेना
ओली ममता मिळे कुठेना
भेटीगाठी नित्याच्या पण
सूर मनाचा जुळे कुठेना
बाग बहरली म्हणतोय खरे
कळी मोकळी हसे कुठेना
सर्वांना जी सोबत घेई
अशी पालखी निघे कुठेना
चार बंगले नावी त्याच्या
शांती,संयम वसे कुठेना
सूर्य लोळतो अंगणात पण
किरण सुखाचा पडे कुठेना
गल्लोगल्ली ज्ञानमंदिरे
अस्सल मानव घडे कुठेना
२.
होईल तुझ्या मनासारखे करून तर बघ
भल्या-बुऱ्याला आग लावुनी जगून तर बघ
व्यर्थ कशाला नाव ठेवितो जगास या तू
स्वतःच आधी मानव म्हणुनी घडून तर बघ
तुला वाटते तसे कदाचित घडेलही जग
नवक्रांतीची मशाल हाती धरून तर बघ
जिद्द, चिकाटी अंगी बाणव सर्वार्थाने
कठीण नाही शिखर यशाचे, चढून तर बघ
रणांगणी ह्या तूच विजेता ठरणार खरा
स्वार्थ त्यागुनी जनकल्याणा लढून तर बघ
कळणार तुला कष्ट खरोखर पोशिंद्याचे
माथ्यावरच्या उन्हात थोडे खपून तर बघ
कष्ट वेचले अमाप ज्यांनी तुझ्याचसाठी
त्यांच्यासाठी एकदा तरी झटून तर बघ
३.
मायच होते पाठीराखी रडलेच कुठे जर मी
आभाळाची साथ पित्याची हरलेच कुठे जर मी
समर्पणाने त्यांनी माझी अशी मशागत केली
शिक्षा भारी गुरूजनांची घडलेच कुठे जर मी
संकट समयी आधाराची काठी होते ताई
हात धरोनी वाट दावते अडलेच कुठे जर मी
पाठीवरती हात ठेवुनी हिंमत देतो दादा
'मी आहे ना?'मला सांगतो फसलेच कुठे जर मी
जातोय जरी दूर घराच्या सखा काळजी घेतो
तत्पर असतो सेवेत सदा थकलेच कुठे जर मी
गब्बू होता बाक मागचा सखया उनाड साऱ्या
धावत येती सर्व आजही पडलेच कुठे जर मी
वर्चस्वाचे स्तोम माजले जिकडे-तिकडे हल्ली
खरा मार्गदिप ठरते घटना नडलेच कुठे जर मी
ह्रदयामध्ये विश्वासाची गाठ बांधुनी असते
दुःखांचाही उत्सव करते खचलेच कुठे जर मी
कुणीतरी तो डोक्यावरती हात कृपेचा धरतो
अलगद हाती उचलुन घेतो ढळलेच कुठे जर मी
.............................................
अर्जुमनबानो शेख
बल्लारपूर, जि-चंद्रपूर
मो:-8055947453
No comments:
Post a Comment