तीन गझला : हेमलता पाटील

 




१.


पुन्हा देहात झालेली सुरू सळसळ कशी रोखू 

अनाहत हा तुझा दरवळ, तुझी वर्दळ कशी रोखू


नभाच्या चांदण्यांशी ही लगट मी पाहिली चंद्रा

मनाच्या आत होणारी अता जळजळ कशी रोखू


कितीदा लावले आणिक कितीदा वाहिले काजळ

सजवले आर्त डोळे पण व्यथित ओघळ कशी रोखू


तुझ्या या चेहऱ्यावरची बघुन ही वाटली शांती

मनाच्या आत असलेली तुझी खळबळ कशी रोखू


कवच अन् कुंडले काढुन दिली इंद्रास तू अर्पण

अरे दिलदार कर्णा मी तुझी ओंजळ कशी रोखू


२.


चिता कधीची जळते आहे माझ्यामध्ये

माझे 'मी'पण सरते आहे माझ्यामध्ये


पहाट वेडी झुरते आहे माझ्यामध्ये

धुके होउनी विरते आहे माझ्यामध्ये


गोड शिरशिरी उठली साऱ्या देहावरती

उनाड वारे शिरते आहे माझ्यामध्ये


कसे करावे शांत तिला हे समजत नाही

व्यथीत सल धुसफुसते आहे माझ्यामध्ये


सुन्न मनाच्या झोक्यावरती बसली आहे

आठवण तुझी झुलते आहे माझ्यामध्ये


जुन्या सोबती दुःख नवेही रमते आहे

गट्टी त्यांची जमते आहे माझ्यामध्ये


नसे जगाच्या रडगाण्याशी घेणेदेणे

मूल निरागस हसते आहे माझ्यामध्ये


३.


नक्षत्रांचे देणे म्हणजे माझी मुलगी 

सौंदर्याचे लेणे म्हणजे माझी मुलगी 


गतजन्मीचे पुण्य असावे शिल्लक काही 

जन्माला ते येणे म्हणजे माझी मुलगी


स्थावर जंगम जे जे होते अमुच्यासाठी 

दैवाकडुनी घेणे म्हणजे माझी मुलगी


दोन कुळांचा जपते आहे खरा वारसा 

वंश चालवत नेणे म्हणजे माझी मुलगी 


सजुनी धजुनी येते जाते समोर माझ्या

आठवणींचे मेणे म्हणजे माझी मुलगी 

...............................................

No comments:

Post a Comment