१.
वाटेत हात कोठे ओले करून आली
माझी गझल कुणाचे, अश्रू पुसून आली
शब्दांत नवरसांचा, घेऊन गोडवा अन्
नक्षत्र दागिन्यांनी, कविता नटून आली
कष्टातल्या जिवांना देऊन धीर थोडा
घामात लेखणीही थोडी भिजून आली
चौकात पाहिला मी बाजार चोरट्यांचा
माझी मलाच आता किंमत कळून आली
अजुनी तसाच आहे सिलबंद एक कप्पा
का वेदना तरीही छाती चिरून आली
फुंकर उगी कशाला जखमेवरी कुणाची
झाली जुनी कधीची, आता भरून आली
२.
आयुष्य जाळले मी जळत्या दिव्याप्रमाणे
घ्यावे उगा कशाला, जगण्यातले उखाणे
मातीत वाळवीचा भलता सुकाळ झाला
खातील कुरतडोनी, पेरू नको बियाणे
ऐकून कोण घेतो, नाही कुणी रिकामा
बहिऱ्यापुढे कशाला गातो मधूर गाणे
माझ्या चितेवरी जे गळतील दोन अश्रू
घेऊन सोबतीला आहे इथून जाणे
विश्राम हा क्षणाचा, पक्षी जसे प्रभाती
उतरून अंगणी अन् उडती टिपून दाणे
समजून घे जगाचा व्यवहार रामदासा
बाजार व्यर्थ फिरतो, खोटे तुझेच नाणे
३.
दररोज आरसा हा, मज एक प्रश्न करतो
माणूस तोच आहे, का मुखवटा बदलतो
दळदार बोचरा पण, सांभाळतो फुलांना
बदनाम का तरीही, काटा सदैव ठरतो
युद्धात हारणारा, तू एकटाच नाही
भिष्मासमान योद्धा, शरपंजरी तडपतो
देहात त्राण तोवर घे तू जगून थोडा
रडण्यात अर्थ नाही नेत्रास का भिजवतो
थांबा उसंत थोडी, द्या धूर्त संकटांनो
तुमच्याच स्वागताला दारास मी सजवतो
तू एकटा स्मशानी जळशील रामदासा
आयुष्य चालताना हे सत्य का विसरतो
.....................….....................
रामदास घुंगटकर
मो.९६२३७६५३०२

No comments:
Post a Comment