तीन गझला : सुप्रिया पांडे





१.


राग लोभास या दूर सारीन मी 

बंध नात्यातले घट्ट बांधीन मी


अंगणी चंद्र होऊन येशील का 

चांदणे रोज केसांत माळीन मी


खोलवर अंतरी दुःख मी झाकले

हास्य ओठांवरी नित्य पेरीन मी


पंख फुटले पिलांना नको थांबवू

आसवे पापणीआड लपवीन मी


प्राक्तनाचे मला भय नका दाखवू

भाग्य बदलीन मी भाग्य घडवीन मी


२.


जीवनात चांदरात जर हवीय यायला 

चांदणी बनून वाट पाहिजे बघायला


वाकुनी मनात पाहिले तिने असेल का

लागलेत सल तिला मनातले कळायला


मीच नेहमी उजेड पाडतो म्हणे दिवा

वात लागली निमूट आतुनी जळायला


सांगतात एक वागतात वेगळे इथे

लागले मनामधील भाव ओळखायला


रात्र रात्र जागुनी लिहून पाहते गजल

काळजातली जखम नको तुला कळायला


३.


चार चौघांपुढे हासतो चेहरा 

दुःख हृदयातले झाकतो चेहरा


मूक ओठांवरी थांबल्या भावना 

शब्द डोळ्यांतुनी बोलतो चेहरा


केस कुरळे तिचे गौर गालांवरी 

चंद्र गगनातला वाटतो चेहरा


तीर नजरेतुनी झेलतो प्रीतिचे 

पापण्या झुकवुनी लाजतो चेहरा


नवनवे मखमली घालतो मुखवटे 

वेगळा नेहमी भासतो चेहरा

..............................................

No comments:

Post a Comment