१.
चार भिंती एक छप्पर रोजचे
जीवघेणे प्रश्न शंभर रोजचे
फार आवडते तरी; कंटाळलो
हे नको लावूस अत्तर रोजचे
तोच असतो प्रश्न माझा रोजही
तू नको देऊस उत्तर रोजचे
फार आवडतात का अश्रू तुला?
मी करू का दुःख सादर रोजचे?
मान धरते भूत दिवसांचे जुन्या
आणि करते प्रश्न नंतर रोजचे
नेसते ती भरजरी ओठी हसू
टोचते आतून अस्तर रोजचे
२.
संपली जत्रा…पुन्हा मागे धुराळा ठेवला!
पांगली गर्दी… कुठे बाकी जिव्हाळा ठेवला!
मी तिच्या वाट्यातलेही ऊन ठेवुन घेतले
अन् तिने डोळ्यात माझ्या पावसाळा ठेवला
जीव घेतो पापणीचा एक साधा वारही
का तरीही हनुवटीवर तीळ काळा ठेवला
प्रेम देताना कधी मी मांडले नाही गणित
पण जगाने फायद्याचा ठोकताळा ठेवला
खूप आले लोक अंती द्यायला श्रद्धांजली
भाषणामध्ये पुन्हा खोटा उमाळा ठेवला
३.
फक्त ओझ्याचेच वाहक होत जाते
एकतर्फी जे कथानक होत जाते
वाट जाते भरकटत जेव्हा कुठेही
चालणे तेव्हा निरर्थक होत जाते
मन अचानक वागते वैऱ्याप्रमाणे
आपले असुनी विरोधक होत जाते
धीर सोडू लागतो जेव्हा खलाशी
आणखी वादळ भयानक होत जाते
पुण्य करते बंद डोळे; शांत बसते
त्यामुळे बलवान पातक होत जाते
दुःख मोडत राहते व्याख्या सुखाची
सोसणेही जास्त व्यापक होत जाते
सूर जखमांशी जुळाया लागला की
आतले दुखणे निरर्थक होत जाते
..............................................
अमोल शिरसाट
मो.9049011234

No comments:
Post a Comment