मा.सुरेश भट यांचा मिसरा-
'तू खुले आकाश माझे तू नवा विश्वास माझा '
सामान्यतः तरही मिसरा गझलेच्या मतल्यात घेऊन लिहिलेल्या गझला वाचायला मिळतात. मात्र मा. सुरेशकुमार वैराळकर अण्णांनी या तरही गझलेत तरही मिसरा शेवटी घेऊन ही एक सुंदर गझल लिहिली आहे.
- देवदत्त संगेप
या फुलांना या ऋतुंना घेउद्या अदमास माझा
यार हो,अद्याप नाही संपला मधुमास माझा
का नवी आमंत्रणे देतेस आता तू अवेळी ?
जाहला हा ऐनवेळी मंद श्वासोश्वास माझा
काळजी ही लागलेली आसमंताला फुकाची
काय उल्हासाविना जाईल फाल्गुन मास माझा ?
लाघवी स्वातंत्र्य तुमचे व्यर्थ मी स्वीकारले पण
याहुनी होता बरा प्राचीन कारावास माझा
लावण्या, गझला, तराणे नित्य मी गातो पवाडे
(तज्ज्ञ म्हणती योग्य नाही स्वर तसा भजनास माझा)
मी तसा इथल्या दिशांनी बांधल्या गेलो तरीही
तू खुले आकाश माझे तू नवा विश्वास माझा
(मार्च २००७)
...............................................

No comments:
Post a Comment