१
जरा समजावुनी सांगा कुणी या वेंधळीला
लळा का लागला आहे उन्हाचा सावलीला
तिच्या नाजूक ओठांवर गझल त्याने लिहावी
नसे याहून मोठी भेट एका प्रेयसीला
फुलवताना अनेकांच्या गुलाबी चांदरात्री
किती रुततात काटे अंगभर त्या बाभळीला
अरे सांभाळते संसार ती इतक्या खुबीने
तरी बांधून का घेतो तिला तू दावणीला
२.
व्यस्त असल्याचे बहाणे, ठीक नाही
अन् मला विसरून जाणे, ठीक नाही
आपली जर वाटते आहे तुला मी
वागणे परक्याप्रमाणे, ठीक नाही
आठवांची ओल आहे पापणीला
विसरण्याचे गीत गाणे, ठीक नाही
सोडती जर जन्मदात्या मायबापा
फोडणे केवळ फुटाणे, ठीक नाही
मानता लक्ष्मी मुलीला भूतलाची
सांगणे खोटेच नाणे, ठीक नाही
बाटल्या बेभाव विकती बारमध्ये
भाकरी निम्म्या दराने, ठीक नाही
३.
या जिव्हाळ्याचा जिवाला भार होताना
सांत्वनाला पाहिले बेजार होताना
केवढा छळतो तुझा हा व्यस्त आठवडा
रोज बघते मी तुझा रविवार होताना
माणसांनाही स्वतःची लाज वाटावी
पत्थरांचा रोज जयजयकार होताना
सूर्य होता येत नसल्याची नको चिंता
मेणबत्ती होउया अंधार होताना
बाब चिल्लर ही कशी खुर्द्यास समजेना
लायकीही लागते कलदार होताना
स्फोट झाल्यावर फटाक्याचा बळी जातो
ही व्यथा असते धमाकेदार होताना
दूरही गेली कधी जपते पिलांना तू
पाहिले आई तुला मी घार होताना
...............................................
खूप सुंदर 👌 अगदी स्त्रियांच्या भावना जपणारी कविता आहे 🥹🙏
ReplyDelete