१.
भेटतोस तू जेव्हा जेव्हा गझल अंतरी उमटत जाते!
शब्दसुरांच्या सागरात मी हळूहळू मग हरवत जाते!
माझ्यासोबत असताना तू जगात कोणी दुसरे नसते
आसपासच्या माणसांत मी एकांताला चकवत जाते!
तुला वळवण्या दिशेस माझ्या कलप लावते, मेकप करते
दागदागिने गजरे माळुन मी माझे वय लपवत जाते!
माणसांत मी *निव्वळ माणूस, मिठीत तुझिया होते राणी
स्पर्श तुझा *मजर ओळख देतो, मी माझेपण खुलवत जाते!
शाळेमधले धडे संपले, पाठांतरही आता सरले
परंतु जगणे रोज नव्याने नियती मजला शिकवत जाते!
बहर वयाचा उरला थोडा, अशात झाले तुझे आगमन
तुझ्यासंगती फुलल्यावर मी, सहा ऋतूंना हिणवत जाते!
हवे कशाला हेवे-दावे? माझे खोटे तुझे ते खरे
संसाराला देण्या टेकू तुझीच पाटी गिरवत जाते!
जो तो भासे तुझ्यासारखा... तुझ्याच लकबी येथे तेथे
अता एकटे जगण्यासाठी आठवणींना उजळत जाते!
२.
जगण्यात मन रमावे आता असे न काही!
तुझियाविना जगावे आता असे न काही!
लटकेच भांडताना धरलास तू अबोला
मीही पुन्हा रुसावे आता असे न काही!
हलकेच सर बरसली मोहोर काल झडला
मी मोहरून यावे आता असे न काही!
उमलून रातराणी गंधीत रोज होते
मनमोर धुंद व्हावे आता असे न काही
अंधारल्या दिशाही निजलीत पाखरेही
घरट्याकडे वळावे आता असे न काही!
ते श्वास थांबताना नाहीस बोलला तू
श्वासास मी जपावे आता असे न काही!
३.
श्रीमंतांचे शहर असावे!
हे शोभेचे मखर असावे!
जिवलग नाही येथे कोणी
हे परक्याचे नगर असावे!
घराभोवती अजून मेंदी
आठवणींचे प्रहर असावे!
ऋतु सरल्यावर आठवणींनी
थरथरणारे अधर असावे!
अमृत समजुन प्राशन केले
तेच खरोखर जहर असावे!
तुझी गझलही कशी सुगंधी?
मनात 'माझे' बहर असावे!
......….....................................
प्रा. प्रतिभा सराफ,
मो.९८९२५३२७९५
No comments:
Post a Comment