तीन गझला : रवींद्र सोनवणे

 





१.


गुंतण्याचे आवरावे  म्हणतो 

हे शहर सोडून जावे म्हणतो


एकटेपण खात जाते जेव्हा

मी स्वतःला सावरावे म्हणतो


एकमेका वाचण्याचे सारे 

चल शिकूया बारकावे म्हणतो


जे तुझ्यामाझ्यात आहे इथवर 

सर्वकाही ते जपावे म्हणतो


कालिदासाचे जसे शाकुंतल

मी तुझ्यावरही लिहावे म्हणतो


कोणता आहे दुवा प्रेमाचा? 

जाणण्यासाठी जगावे म्हणतो


भेटलो आता जसे ह्या जन्मी 

जन्मजन्मी हेच व्हावे म्हणतो


स्पष्टता नात्यात यावी यास्तव

अजनबी होउन बघावे म्हणतो


जन्म-मृत्यू यातले हे जगणे

संपल्यावरही उरावे म्हणतो


२.


आस कोणती डोळ्यांमध्ये जागत असते हल्ली 

हे झुरणारे एकाकीपण खूप जाचते हल्ली


कातरवेळी मन कोणाच्या स्पर्शासाठी झुरते

भासच असतो गगन धरेला जिथे भेटते हल्ली


प्रत्येकाला उब मायेची हवी हवीशी असते

म्हणुन बहुधा धरणी सुद्धा नभ पांघरते हल्ली


असंख्य इच्छांचे ओझे घेऊन चालला जो तो

अशी कशाची ओढ कोणती दिशा सुचवते हल्ली


अराजकाचे राज्य पसरले अवघ्या विश्वामध्ये

अशांततेच्या पुढे शांतता भीक मागते हल्ली!


समुद्रमंथन झाले तेव्हा एक हलाहल आले

त्याची दाहकता कैकांचे विश्व जाळते हल्ली


तलवारीच्या जागी आली अण्वस्त्रांची टोळी 

धर्माच्या नावाखाली रण इथे चालते हल्ली


पिसाटली श्वापदे जणू माणसे भांडती सारी 

कुणाकुणाच्या रक्ताने ही धरा नाहते हल्ली


प्रांताप्रांतामधे वाटले गेले विश्वच सारे

मी कोणाचा सूर्यालाही कोडे पडते हल्ली


३.

 

केवढा आकांत येथे हा कुणाचा प्रांत आहे?

लादली कित्येक श्वासांवर इथे संक्रांत आहे


रोज येती आश्रयाला पांगलेल्या कैक इच्छा 

देह  माझा हा अताशा आश्रितांचा प्रांत आहे


धावणारे हे तुझे मन कोणत्या शोधात आहे ?

देश स्वप्नांनीच केला पूर्ण पादाक्रांत आहे


रोज विरणारी अपेक्षा जाहली आहे नकोशी 

जन्मतः ठरवून असतो बघ तिचा देहान्त आहे


संकटांशी युद्धरत जो ठेवतो कायम स्वतःला 

तो खरा योद्धा जगी अन् तो खरा विक्रांत आहे


जन्मभर झाली उपेक्षा छानसे जगता न आले 

खंत ही हृदयी तरीही हे कलेवर शांत आहे 


हा ‘रवी’ वेडाच आहे! भामट्याला चोर म्हणतो 

उंदराला साक्ष मांजर येथला सिद्धांत आहे

.........................…..................

No comments:

Post a Comment