तीन गझला : अलका देशमुख

 




१.


कल्पनेचा हा कली आहे मनातच माजला

या जिवाचा कोपरा अन् कोपरा मग व्यापला


राज्यकर्ता राम हा कल्याणकारी गाजला

त्याचवेळी जानकीचा सौख्य ठेवा त्याजला


रोज क्रौर्याच्या नव्या शिखरावरी चढला कली

कोवळ्या होत्या कळ्या पाहून ईश्वर लाजला


सोडले जगणे तरीही जीव अडकुन राहिला 

प्रेम, माया अन् जिव्हाळा का तुझाही आटला?


बोकडाला फासला शेंदूर... चारा घातला

अंध-श्रध्देचा बळी बोकड बिचारा चालला 


२.


संसार आहे आपला दोघात का भांडायचे?

कोंडा असो वा पीठ ते अळणी कसे रांधायचे?


अपमान सगळे सोसले दुःखातही मी हासले

एकाच अभिलाषेत की मापास ओलांडायचे


खोट्या प्रतिष्ठा राखल्या सीमा कधी ना लांघल्या 

जळते निखारे कोंबले अश्रूच जर सांडायचे 


लोकांस परक्या जोडण्याला घातली मज बंधने 

तोडायला सगळे उभे सांगा कसे सांधायचे...?


मन मोकळे झालेच नाही कोंडल्या मग भावना

कोड्यात तू बोलायचे शब्दात मी मांडायचे ?


आक्रंदला जिव तोडला आटापिटा हा रोजचा

नाहीच कोणी ऐकले काळीज बस् बांधायचे 


३.


बघे, दिवाणे सारे जमले इतकी गर्दी झाली

मदतीला ना कोणी आले नुसती गर्दी झाली


सत्तालोलुप सगळे नेते खुर्ची हवी म्हणाले

आश्वासनही खोटे ठरले जितकी गर्दी झाली  


काळाचा तो घाला... काही क्षणात... कळले नाही

विमान पडले बघण्या रस्त्यावरती गर्दी झाली


भाडोत्री आणलेत... सगळे गोळा केले होते

भाषणात त्या टाळ्या पिटण्या पुरती गर्दी झाली


पोर नागडी कोण अभागी उपडी पडली होती

फोटो व्हिडिओ घेण्यासाठी  सगळी गर्दी झाली 


कळवळलेले मायबाप रडणारे नाते दिसले

नुसत्या चर्चा नुसत्या गप्पा सुतकी गर्दी झाली


रोज बातम्या नवे गुन्हे अन् हाहाःकारच आहे

काय चालले बघण्या जगात उपरी  गर्दी झाली

.............................................

No comments:

Post a Comment