१.
भोगावयास सत्ता झालेत सज्ज सारे
विकतील एक दिवशी हे सूर्य, चंद्र, तारे
ओठांवरी मधाचे लावून बोट फिरती
अपुल्याच सभ्यतेचे पिटतात हे नगारे ...
स्वप्नात रोज जनता खातेय दूध लोणी
झालेत फक्त कोरे स्वप्नात सातबारे
देशाभिमान यांच्या धमण्यात पार शिरला
पडली कमीच यांना देशातली गटारे
समजून घ्या जरासे उघडून बंद डोळे
पाहून ताल सारा काहीतरी शिका रे
बलिदान व्यर्थ वाया जाऊ नये कुणाचे
स्वप्नामधून आता लवकर तुम्ही उठा रे
होतेय काय हल्ली, बघतोय काय आपण
झाले स्मशान सुन्नं पाहून हे ढिगारे
२.
एकटेपण केवढे सलते घरी
सर्व आहे पण तरी का हुरहुरी
ठेवला विश्वास ज्याच्यावर कधी
तोच ठरला शेवटी मारेकरी
मी कुणा पटलोच नाही फारसा,
मग कशाला ठेवतिल ते अंतरी
दोन चाकांचा असे संसार हा
एकट्याने ओढता किरकिर करी
शक्यता नाकारता येते कुठे
दोन घोटानेच येते तरतरी
आजही लक्षात ती हिरवळ तुझी
शब्द होते की तुझी जादूगरी
पेरलेले कापणे अनिवार्य हे
शेवटी कर्मास ना वाटेकरी
३.
एवढे नाही सहज जगणे इथे
रोज छळते पाशवी मरणे इथे
व्हायची नाही कधी इच्छा पुरी
का तरी हे रोजचे धरणे इथे
बोलले आयुष्य मजला, "श्वास दे !"
आवडत नाही कुणा मरणे इथे
संकटे येतील येथे जन्मभर
घाबरत, नाही बरे रडणे इथे
मी कुठे म्हटले मला तू चंद्र दे
तू दिले मजला तुझे नसणे इथे
...............................................
No comments:
Post a Comment