१.
एकदा खेळून सारीपाट तू
लावली धर्मा खर्याची वाट तू
पलिकडे नाही तुझ्या काही दिसत
विठ्ठला आहेस का घनदाट तू
शुष्क मी आहे किनार्यासारखी
सागराची अन् त्सुनामी लाट तू
मी जिवाचा कान करते प्रियकरा
कौतुकाचे घ्यायचे कंत्राट तू
मांडलिक केलेस कायमचे मला
आखला प्रेमात फसवा घाट तू
माफ केल्यावर तुझा पहिला गुन्हा
ती पुढे केलीस का वहिवाट तू
२.
उपवासाचे खरे प्रयोजन मला माहिती आहे
स्वास्थ्यासाठी उत्तम लंघन मला माहिती आहे
भक्तांमध्ये विठ्ठल गढला रखुमाई ना सोबत
करतेय कशी दुरावा सहन मला माहिती आहे
मनमानी ना करत कधी मी मनही मारत नाही
काबूत कसे ठेवावे मन मला माहिती आहे
वेळ मिळाला नाही असले रडगाणे का गाऊ
वेळेचे जर योग्य नियोजन मला माहिती आहे
लग्नगाठ मी फास गळ्याचा कधी मानला नाही
काळजीमुळे आले बंधन मला माहिती आहे
शक्ती, बुद्धी, भक्तीनेही कुठे वाचला रावण
अहंकार हे मोठे लांछन मला माहिती आहे
विसर स्वतःला, एकरूप हो नामामध्ये इतका
भरल्या पोटी दिलेस प्रवचन मला माहिती आहे
३.
आत्मा अन् देहामध्ये श्वासाचे अंतर असते
मिरवावे की मिटवावे मृत्यूवर निर्भर असते
मैत्रीला मी नात्याचे ना लेबल लावत कुठले
कुठल्याही नात्यापेक्षा मैत्री अजरामर असते
मी बघते त्या स्वप्नांच्या पूर्तीची खात्री आहे
नाजुक स्वप्नांना माझ्या कष्टांचे अस्तर असते
शिस्तीचा बडगा आता अवडंबर वाटत नाही
मी आई झाल्यावरचे हे जादूमंतर असते
नात्यांमध्ये मैत्रीची मी कायम पखरण करते
प्रत्येकच हृदयामध्ये मग जागा स्थावर असते
माहेरी जाते पत्नी तेव्हाही सुटका नसते
नजरेची लक्ष्मणरेषा का भासत घरभर असते
मृत झाल्यावर व्यक्तीला का केवळ बाॅडी म्हणता
व्यक्तीशी नाते केवळ ती असते तोवर असते?
..…...............….....................
No comments:
Post a Comment