१.
काळ बदलला मने बदलली हृदयी नाही ओल
चलन कागदी ठरते वजनी नाती सडली खोल
कैक घुसळती केवळ पाणी मिळते लोणी तरी
सडक आमुची तरी लागतो भरावा सदा टोल
महिमा जगती घुमतो कानी शब्द पालनाचाच
टगे सकलही ठरुन शिरजोर वचने होती फोल
मती संतुलित हवी नेहमी ज्ञानी सांगति जगी
समज संपता कानी पडती सकल पोपटी बोल
समस्त पळती उरी फुटेतो मिळवीण्या भाकरी
मरणापेक्षा सरण महाग जिवाला कुठले मोल?
नसे पायी कुणाच्याच पायपोस कुणाचा नीट
रणांगणी ना फसायचे दुनिया असते रे गोल
आपण कठपुतळे रे नियतीघरचे सांगे कुणी
जीवन असते नाटक अपुला नेटका करा रोल
पद टाकावा सदा ओळखुनि निसरडी ती जमीन
मिळता यश पाय हवा जमिनीवर सावरण्या तोल.
२.
जातेय सत्य सुळी कायदा धनाचा यार झाला
फेडण्या वस्त्र पांचालीचे सज्ज दरबार झाला
झाला छप्पर दिवसरात्र झेलून पाऊस वारा
चौसोपी वाड्यातही जन्मदाताच भार झाला
सुरी जरी सोन्याची म्हणून घ्यावी खुपसून उरी?
येतील प्राण कंठाशी गा हव्यास फार झाला
वश झाडे कुऱ्हाडीला समजून गणगोत दांडा
मिटून डोळे आप्त मानता विश्वास ठार झाला
लावती कलागती सदा पांघरून वसने खादी
म्हणती सेवक जनतेचे हा खोटा प्रचार झाला
तोडता सकल तरू पाखरे जाती सोडून गाव
भूक तुझी दांडगी तू बकासुरी अवतार झाला
जाता परदेशी वाटतेय माय गरीब अडाणी
स्वार्थापायी देशाभिमान परि हद्दपार झाला.
३.
मोडला हात परि लढण्याचा ठाम निर्धार आहे
होण्याआधी भार घेण्यास निरोप तयार आहे
गरज नसे मज शपथेची गीतेवर ठेवून हात
वर्तनास माझ्या सत्याचा ठोस आधार आहे
उत्कर्ष दुज्याचा डोळी सलतो हीन दिवाभीता
पराजयाचा मला मिळाला कुठे होकार आहे?
लावूनिया शिकवणी भर कोठार सांगती सोदे
आत्मा विक्रीचा ठेवलाय दूर बाजार आहे
लावून कलागती आजकाल ठरती थोर नेते
कोंबडे झुंजवणे हा अमान्य मला प्रकार आहे
मानती डस्टबिन हातपाय थकताच मायबापा
माणसाचा तुम्हा केवळ लाभला आकार आहे
झाले जगून आनंदाने जावे म्हणतो आता
काय करावे यमराज रोज देतो नकार आहे
..............................................
सदानंद पुंडपाळ, मुंबई
मो. ९४०४९६८८२९

No comments:
Post a Comment