१.
जराशी ओल ह्या चित्रात काढू
जुनी छत्री जुनी बरसात काढू
जगाला माहिती होवो न काही
विषय अपुल्यातला अपुल्यात काढू
जळूदे आजही जळतील काही
तिचा फोटो तिच्या दारात काढू
घराची बाग बनवुन जिंदगी, चल
सुखे वेचून आनंदात काढू
मनाचा ठेवला तेवत दिवा मी
कशाला रात्र अंधारात काढू
निसर्गाने दिलेले सर्व काही
निसर्गाची कशाला जात काढू
स्वतःशी बोलुया म्हणतोय थोडे
दिवस चल एक एकांतात काढू
२.
कालचे काहीच नाही आठवत
आपले काहीच नाही आठवत
बोललो होतो तुझ्याशी खूप पण
काय ते काहीच नाही आठवत
काढला हा सोबतीने जन्म पण
चालणे काहीच नाही आठवत
पोळलो आहे उन्हाने एवढा
चांदणे काहीच नाही आठवत
आठवांचा पालथा केला घडा
छानसे काहीच नाही आठवत
एक तू अन् एक मी होतो खरे
वेगळे काहीच नाही आठवत
दुःख आहे भोगले आयुष्यभर
त्यामुळे काहीच नाही आठवत
वेदना माझ्या मला विसरायला
सुख तुझे काहीच नाही आठवत
बाटली होती तिथे अन् ग्लासही
त्यापुढे काहीच नाही आठवत
३.
संपला अवतार इथला, चल निघूया
सोड पाहुणचार इथला, चल निघूया
जायचे आहे उजेडाच्या दिशेने
वाढला अंधार इथला, चल निघूया
दुःख लाटेसारखे आले अचानक
मोडला संसार इथला, चल निघूया
काळजी नाही करत कोणी तशीही
जन्मही लाचार इथला, चल निघूया
घ्यायला मी भाग या चर्चेत आलो
पण विषय भंगार इथला, चल निघूया
भ्रष्ट इच्छा, मोहमाया, लालसेने
बाटला व्यापार इथला, चल निघूया
मान नाही राहिला सिंहासनाला
बाद कर दरबार इथला, चल निघूया
..............................................

No comments:
Post a Comment