१.
पाटी, पुस्तक, वही, लेखणी सारे देऊ
अन् ओंजळीत जाणीवांचे तारे देऊ
हवे असल्यास उडण्याचा तू सराव करना
पंखात तुझ्या ऊर्जेचे मग वारे देऊ
केविलवाणे नको वाटते बोल बोबडे
म्हणून ओठी उत्साहाचे नारे देऊ
ओल ठेवण्या हृदयामध्ये हिरवी हिरवी
संस्काराचे ऋतू उन्हाळी न्यारे देऊ
माणुसकीचे फूल टवटवित फुलण्यासाठी
डोळ्यालाही पाणी थोडे खारे देऊ
२.
कशाला मी बनू कारण दिखाव्याचे
नको मजला नको दडपण दिखाव्याचे
विचारांच्या दिशा जर भिन्न झाल्या तर
अखेरी राहते घरपण दिखाव्याचे
तुझी माया मला पुरणार जीवनभर
शिदोरीला नको आंदण दिखाव्याचे
अता माझे मला शोधून झाल्यावर
कशाला दाखवू दर्पण दिखाव्याचे
खरी माया वितळली काळजामधली
घरी-दारी नको तोरण दिखाव्याचे
दिखाव्याने सुखी झालाय का कोणी
तुला लखलाभ हो धोरण दिखाव्याचे
समाधानात इच्छा राहते माझी
करे ना साजरे ती सण दिखाव्याचे
३.
इतका कसा घसरला हा क्लास माणसाचा
चारित्र्य, शील, संयम जर श्वास माणसाचा
होतो घडोघडीला का ऱ्हास माणसाचा
सांगा कसा टिकावा इतिहास माणसाचा
जोपासले मनाशी तू द्वेषभावनेला
तर जिंकशील कैसा विश्वास माणसाचा
पुरता अजून कळला आहे कुणास मानव?
ठरवून कर नव्याने अभ्यास माणसाचा
झालेच जर मनाचे मणिपूर एकदाचे
नंतर उरेल केवळ आभास माणसाचा
घे ओळखून नांदी तू काळ-वेळ यांची
ठेवू अखंड आपण मग ध्यास माणसाचा
...…......................................
वाह... खूप छान
ReplyDelete