तीन गझला : भागवत उर्फ बाळू घेवारे

 




१.


नकोस मानू राग पावसा

फुलव साऱ्यांचि बाग पावसा


वसंत मागे बहरुनि गेला

घेतात तुझा माग पावसा


ग्रीष्माने बघ अंग भाजले

टाक धुउन तो डाग पावसा


कसेल त्याची पिकेल शेती

तुझा हवा सहभाग पावसा


वृत्ती लहरी माणसांचीच

तू तरी नीट वाग पावसा


बरस मनसोक्त आनंदाने

नको रडीचा भाग पावसा


'बाळू' साधा शेतकरी पण

मिळेल का अनुराग पावसा ?


२.


जरी सर्व दुनिया तुझ्या भोवताली

कठिण वेळ येता तुला कोण वाली ?


कशाला मुखी लावतो मद्य-प्याला

जरी उच्च शिक्षित तरी तू मवाली


प्रतीक्षेत त्याची पुरी रात गेली

सकाळी तिची मात्र डोली निघाली


स्वतःच्याच कोशात जगतो किती तू

कधी परकियांची पुसावी खुशाली


मुखी साखरेचा खडा तो परंतू

हरामी न सोडी कधीही दलाली


जरी नित्य वारी तुझी बा विठोबा

किती कोरड्या वाहतो मी पखाली


३.


खोल गेली भावनेची ओल येथे

आसवांना राहिले ना मोल येथे


हायवे झाला तुझाही वाटतो बघ

भेटण्यासाठी तुलाही टोल येथे


देव जर बंदिस्त आहे राउळी तर

कोणता त्याचा असे हा रोल येथे


फिरुन आला त्याच जागी बोलला मग

सत्य आहे सर्व दुनिया गोल येथे


चांगल्याच्या का नशीबी ही अवस्था

नेहमी करतात त्याला ट्रोल येथे

................…..........................

भागवत (बाळू) घेवारे, धाराशिव

मो.९४२१९७८५९७

No comments:

Post a Comment