१.
जीवनाचा आरसा असते गझल
वास्तवाचे रूप दर्शवते गझल
पेरुनी शब्दात हृदयीच्या कळा
गुंफल्या शेरात की खुलते गझल
अनुभवांचे पाठ मौलिक पढवुनी
माणसाला जाणता करते गझल
मोल बाजारी न अश्रूंना जरी
मोल रत्नांचे तया देते गझल
भाळता राधा कुण्या कान्ह्यावरी
बासरी सुमधूर आळवते गझल
माय सावित्री पिता ज्योती जया
पोरके नाहीत ते म्हणते गझल
वाचुनी डोळ्यांत दुःखाच्या कथा
आसवे व्यथितांचिही पुसते गझल
जाणुनी प्रेमळ फुलांच्या भावना
पाखरांच्या चोचितुन गाते गझल
तिमिर वाटेचा छळाया लागता
दीप होउन अंतरी जळते गझल
पीळ हृदयाच्या कसुन तारेस द्या
मग पहा झंकारुनी गाते गझल
२.
वेड लागले मनास आहे
प्रीत जाहली तयास आहे
कोण मीच मज कळे न अजुनी
करित आरसा तपास आहे
सृष्टीचा सम्राट सूर्य पण
तया न दासी न दास आहे
घर सुंदर तृणमातीचेही
जिथे मायचा निवास आहे
ती देवाच्या बाग फुलांची
जिथे निरागस सुहास आहे
स्वप्ना तू येशिल का सोबत
दूर एकटा प्रवास आहे
घाव सुगंधी मधुर कळाही
वार फुलांचा जिवास आहे
चुकून ज्याने मला वाचले
वदला पुस्तक झकास आहे
३.
पौर्णिमेचा चंद्र जव दारात आला
गंध सखये कां तुझा वाऱ्यात आला
मन किती रडले दुरूनच पाहिले जव
सोनचाफा फुलुन त्या गालात आला
श्रावणाने उधळले मोती तयावर
सप्तरंगी सूर्य जव मेघात आला
झोप नाही रात्रभर स्वप्ने तरीही
काय प्रीतीचा ऋतू हृदयात आला
पाहिले प्रीतीमधे जिंकूनही पण
हारण्याचा नच मजा मज त्यात आला
माणुसच का झाड, पक्षी अन् पशूही
बुद्ध सर्वांच्या पहा रूपात आला
बोलता आली कळीला प्रीत नव्हती
भाव प्रीतीचा म्हणुन गंधात आला
...........................................
शंकर विटणकर
९८६००२४६२९
No comments:
Post a Comment