१.
श्रावणसरी येतील रे, तूही जरा येऊन जा
काॕफीसवे अलवारसा मैत्रीमधे रंगून जा
अंतिम अशी इच्छा तुझी पुरवीन मी पुरवून घे
शाळेतल्या मित्रा तुला भेटायचे भेटून जा
भिजली उशी म्हणते कशी दुःखी मना सावर पुन्हा
श्वासातली घुसमट तुझी आता मला देऊन जा
नव्हती कदर माझी तुला ओलांडला मी उंबरा
आता तुला बोलायचे! म्हणतोस तर बोलून जा
माझे-तुझे फोटो जुने माझ्या मनी जपलेत मी
संवेदना अन् वेदना हृदयातल्या घेऊन जा
आहे गझलप्रेमी इथे 'मीना' व्यथा सोडून दे
काही नवे सांगून जा काही नवे ऐकून जा
२.
पुण्यातली दुपार चल जरातरी सफल करू
तुला जशी हवी तशी अतातरी गझल करू
सुरूंग लाव वेदनेस दे तुझी व्यथा मला
करून दूर प्रश्न आज वाटते उकल करू
इडापिडा तुझी टळो घरामधे दिवा जळो
तुझ्याघरी तुला जसा हवा तसा बदल करू
उशास दुःख झोपले नि पायथ्यास वेदना
व्यथेस पांघरून आज काळजी तरल करू
सदैव रात्र पेरते सभोवतीस संकटे
करून दूर वादळे पुन्हा निशा धवल करू
३.
तूच दिलेल्या व्यथा-वेदना अन् दुःखाला सोसत गेले
तुझ्या भ्रमाला मीच लीलया सदैव चुलीत जाळत गेले
नवखी नवरी होते म्हणून सोसत होते सासूबाई
वर्चस्व घरी नंतर माझे वरचेवर मग वाढत गेले
उडण्याआधी पंख छाटले दोर कापले सासरेबुवा
स्वानंदाचे सूत्र गवसले उंच भरारी मारत गेले
संसाराच्या सारीपाटी दीर ननंदा जावेशीही
बाई म्हणून जपून नाती कर्तृत्वावर भाळत गेले
आव्हानांच्या घोड्यावरती वेळोवेळी स्वार होऊन
जिद्द, चिकाटी अन् कष्टाने शिखर यशाचे गाठत गेले
..............................................
No comments:
Post a Comment