तीन गझला : मीनाक्षी गोरंटीवार

 




१.


खोल अंतरी  झिरपत गेले एकाकीपण

घळाघळा मग रडवत गेले एकाकीपण 


स्मरणांची मी कात्रणे जशी चाळत बसले

या जन्माचे उसवत गेले एकाकीपण


कधीतरी तर पाखरे घरी येतील पुन्हा 

या आशेवर कंठत गेले एकाकीपण


हातामधुनी हात निसटला किती अचानक 

आणि मला हे व्यापत गेले एकाकीपण


स्मितहास्याचा रोज चढवला एक मुखवटा

जगापासुनी लपवत गेले एकाकीपण


विसंवाद अन् वितंडामधे हरेक बुडला

प्रत्येकाला डाचत गेले एकाकीपण


सराव केला लढण्याचा मी जेव्हा जेव्हा 

बघता बघता हारत गेले एकाकीपण


एकांताचे निळे चांदणे अन् ही धुंदी

हवेहवेसे वाटत गेले एकाकीपण


डोळे मिटता पट काळाचा दिसू लागला

डोळ्यांमधुनी निखळत गेले एकाकीपण


२.


लाख कमवा काय येते वाटणीला शेवटी 

सत्य म्हणजे चार खांदे सोबतीला शेवटी 


संपणारा जीवनाचा रोल आहे एकदा 

यायचे देवा तुझ्या त्या ओसरीला शेवटी


वंचना अन् वेदनांना डांबले हृदयात मी 

भार झाला आसवांचा पापणीला शेवटी


पद नको पैसा नको ना मालमत्ता कोणती

नम्रता पण ठेव देवा लेखणीला शेवटी


पूर्ण करण्या लेकराचे स्वप्न गगनाएवढे

बांधली स्वप्ने स्वतःची दावणीला शेवटी


धग उन्हाची सोसल्यावर जीव निघला पोळुणी

मग शरण आले फिरूनी सावलीला शेवटी


आप्त-स्नेही खूप सारे जोडले आयुष्यभर

कोण आले सांग कामी अडचणीला शेवटी


३.


खोल तळाशी ठाण मांडुनी बसते इच्छा 

आशेवरती सुप्त मनाची जगते इच्छा 


व्यास न त्रिज्या व्यापुन घेते परीघ सारा 

केवळ एका अंशात कुठे फिरते इच्छा


जोवर असतो देठ कोवळा फार मनाचा 

तोवर अलगद फांदीमधुनी झुलते इच्छा


नकोस आता चित्र रंगवू मना सुखाचे

अश्रूंमध्ये वाहत जाउन विरते इच्छा


आत्मा जातो देह सोडुनी परलोकी पण 

त्याच्यामागे सदैव त्याची स्मरते इच्छा 


हवे तेवढे गुपचुप अपुले पाय पसरते

वास्तव सोडुन स्वप्नामध्ये रमते इच्छा


विवेक सुटतो पाय घसरतो वाटेवरती

मोहाच्या मग दलदलीमधे फसते इच्छा 

.........................…...............

No comments:

Post a Comment