तीन गझला : नंदू सावंत

 




१.


जसा जसा मी ईश्वर माझा शोधत गेलो

तसे तसे मग प्रारब्धाला हरवत गेलो


अंधांमधले डोळस दिसले आपसूक मग

उजेड दिसता मीही त्यांच्यासोबत गेलो


नातलगांची खेळी समजुन येण्यासाठी

कृष्ण नितीचा पाठ मनाशी गिरवत गेलो


पडेल उघडा खोटा बाणा या भीतीने

बुडाखालच्या अंधाराला झाकत गेलो


दुःख पाहिले इतके मी अन् विचलित झालो

स्वर्गसुखाची व्याख्या पुरती विसरत गेलो


सारीपाटावरच्या खेळी देव खेळला

मी तर नुसते फासे त्यावर टाकत गेलो


२.


काय स्मरते का असा थरकापतो मी

भूतकाळाशी घृणास्पद वागतो मी


वाचतो आधी धडे मी पुस्तकांचे

मग जगाच्या चेहऱ्याला वाचतो मी


एकनिष्ठा पाळण्याचे ठरविल्यावर

का पुन्हा दुसऱ्या खळ्यांवर भाळतो मी


प्राक्तनाचा भोग हे ठाऊक असता

का तरी इतका सुखाशी भांडतो मी


ही पिढी की, ती पिढी संभ्रम तरीही

दोनही संगम पिढ्यांचा साधतो मी


एवढे अपराध पोटी घेतल्यावर

चूक माझी... बोल त्याला लावतो मी


शेवटाला जायचे आहे स्मशानी

एकट्याचे दुःख आता जाणतो मी


३.


बघ करून हा त्रास एकदा

घे खरेच तू फास एकदा


दान द्यायचे वाटलेच तर

दे पुढ्यातला घास एकदा


दुःख आरशाला कळेलही

अन् म्हणेल तो हास एकदा


गुंफतोस शब्दांत भावना

गुंतवून बघ श्वास एकदा


परतफेड करतो निसर्गही

टाळ माणसा ऱ्हास एकदा


का असत्य कवटाळतोस तू

घे कुशीत सत्यास एकदा


बघ तुझ्यात अंधार वाढला 

कर मनात आरास एकदा


राहिल्यात इच्छा अपूर्ण तर

ये तुझ्याच जन्मास एकदा


ये बनून अभिसारिका तुही

मोहरेल मधुमास एकदा

...............................................

No comments:

Post a Comment