१.
इथे कसे जगायचे मला कळेचना
कुणास काय द्यायचे मला कळेचना
वरून हासतो तरी मनात दुःख का
कसे जगी रहायचे मला कळेचना
वसंत देखणा तुझा तुला कळू नये
कुणासवे फुलायचे मला कळेचना
घरात ये अशीच तू जसे मनात दीप हे
तुला कसे म्हणायचे मला कळेचना
अजून गीतही तुझे मनास छेडते
कसे सुरात गायचे मला कळेचना
२.
आज येथे मी पहारा देत आहे
अमृताचा चंद्र या जागेत आहे
संपले नाहीच आता युद्ध माझे
हा लढाईचा जरी संकेत आहे
तू तिथे गातेस माझे स्वप्नगाणे?
बासरीचा सूर येथे येत आहे
मी कशाला हाक मारू आसवांना
हा तुझ्या डोळ्यांतला संकेत आहे
राख झाली आज साऱ्या या घरांची
आग माझी माझिया हाकेत आहे
३.
सोडून हात माझा आई कुठे निघाली
आता व्यथाच सारी माझ्या घरात आली
आई तुझा दिलासा देतो मला सहारा
माझा तुझ्याविना गे नाही कुणीच
वाली
आहे तुझीच प्रतिमा हृदयामधेच आई
जातील हे जरीही अश्रू सुकून गाली
माहीत हे मला की, येशील ना कधी तू
तू नेहमीच माझ्या असतेस
भोवताली
पदरात फाटक्या या माझी असे
शिदोरी
मातीत या कुणाची झोळी नसेल
खाली
..............................................

No comments:
Post a Comment