१.
एकेक कण धुळीचे वाहून ने म्हणालो
आयुष्य वाळवीचे वाहून ने म्हणालो
होणार भार त्याच्या आधीच ने म्हणालो
ओझे जुन्या पिढीचे वाहून ने म्हणालो
सावट किती पसरले आभाळभर ढगांचे
हे दृश्य काजळीचे वाहून ने म्हणालो
बेधुंद कोसळू दे आता सरी सुखाच्या
बस लोण यादवीचे वाहून ने म्हणालो
ती जायच्या अगोदर सोडून एकटे मज
सारे दिवस सुगीचे वाहून ने म्हणालो
करतील वार कोणी देठासकट मुळांवर
गंधाळणे कळीचे वाहून ने म्हणालो
वाहून न्यायच्या तू आधी उभ्या पिकाला
अश्रू जरा बळीचे वाहून ने म्हणालो
काट्यासमान आहे टोचत तिचा अबोला
त्या दुःख बाभळीचे वाहून ने म्हणालो
२.
इच्छा मनात होती नांदत नदीप्रमाणे
मी राहिलो प्रवाही वाहत नदीप्रमाणे
घेऊन खाचखळगे झोळीत सोबतीला
आहे स्वतःबरोबर चालत नदीप्रमाणे
पोटात घेत गेलो मी वेदना मनाच्या
अन् राहिलो स्वतःला हसवत नदीप्रमाणे
नाही कुणीच मोठे नाही लहान कोणी
ओढ्यास घेत गेलो सोबत नदीप्रमाणे
जाऊ नकोस दुःखा सुख पाहुनी असा तू
डोहात थेंब काही ठेवत नदीप्रमाणे
आशेवरी कुणाच्या राहू नकोस निर्भर
तू दान पावसाचे मागत नदीप्रमाणे
आहे जरी निराळा माझा-तुझा किनारा
दोन्ही तटास जा तू जोडत नदीप्रमाणे
खोडून टाक माझ्या हळवे ठसे स्मृतींचे
जा शिल्प कोरलेले मिटवत नदीप्रमाणे
पाहून नागमोडी वळणे तिच्या मनाची
असतो तसाच मीही भटकत नदीप्रमाणे
३.
राहिले इतकेच आता व्हायचे बाकी
जाळल्या राखेतुनी उगवायचे बाकी
खूप वळणे घेत आहे वाट आयुष्या
फक्त कळले पाहिजे थांबायचे बाकी
हेच नाही का पुरे...? माणूस आहे मी
नाव पुन्हा कोणते लावायचे बाकी
दे सुरक्षेची हमी माझ्या मला आता
'लागली बोलू कळी' उमलायचे बाकी
रंगही देऊन झाले जात-धर्माला
काय आहे आणखी मळवायचे बाकी?
एक तारा रोज तुटतो याचसाठी की
राहिले असणार बघ मागायचे बाकी
'छान आहे आमचेही चालले हल्ली'
हेच आहे तेवढे बोलायचे बाकी
घेतली हातात दगडे माणसे होती
कोणते घर राहिले फोडायचे बाकी
माणसे करतील गर्दी याच जन्मी बघ
दुःख आहे आतले कळवायचे बाकी
.............................................

No comments:
Post a Comment