१.
बुद्धिवंतांची संख्या किती वाढायला लागली आहे
काय की भीती त्यांचीच पण वाटायला लागली आहे
शिक्षणाची अभियाने प्रशिक्षणे सदा चालती येथे
पण गुन्हेगारी सारी इथे पसरायला लागली आहे
बोलती नेते आम्ही कधी ना मानतो जात-धर्माला
पण मतासाठी जातीयता झिंगायला लागली आहे
वाटल्या डिग्र्या विद्यापिठांनी झोपड्यांनी दिवे आले
माणसातील का माणुसकी आटायला लागली आहे
चाचपडतो जो तो संभ्रमी त्यातून दाटे तिमिर भवती
काजव्यांची झुंडच मार्ग त्या दावायला लागली आहे
२.
खोदून भूतकाळाला गटारीच शोधणार का?
त्या तोकड्या पुराव्यावर भविष्यास वेधणार का?
घावेल का कधी अनुमान ठेवून विकृती मनी?
कैफात धुंद होऊनीच निष्कर्ष काढणार का?
राखून सूड, द्वेष मनात समता जनास सांगता
माझे खरे म्हणुन, ती काय, हातास लागणार का?
उन्मत्त झुंड ही कोठे दिशाहीन भरकटे अशी?
का लख्ख सूर्यकिरणे पोळती तीस घावणार का ?
घेतात का 'स्वयंघोषीत संशोधक' म्हणवून हे ?
सत्य असे शिक्षेवाचून त्यांनाच सोडणार का ?
जोडील भूतकाळाला भविष्यास, पूल काय तो ?
सत्यार्थ सांगणाऱ्या वर्तमानास टाळणार का ?
३.
काय सांगावे असे का हे व्हायला लागले आता
हे पुरोगामीच भविष्य सांगायला लागले आता
कुंडल्या मांडून बसले ते अनुभवांच्या जरी भवती
चांगले तारेच होरा बदलायला लागले आता
चालली निसटून वाळू पायातली सर्वही त्यांच्या
चूक लाटांचीच! हे ते सांगायला लागले आता
आत्मचिंतन चालले पण निष्कर्ष ना घावला त्यांना
त्यांचेच गुरु मार्ग त्यांचा चुकवायला लागले आता
जाण त्यांना ये अचानक, आस्तिक्य कळु लागले बरवे
मंदिरे मग ते नित्य धुंडाळायला लागले आता
चंग त्यांनी बांधिला मग विजयास ललकारले वेगे
मृगजळाकाठी तपा ते मांडायला लागले आता
...............................................

No comments:
Post a Comment