१.
अजून धावाधाव किती ही
तुला जीवना हाव किती ही
जिकण्यासाठी धावत सुटले
पुढे-पुढे भरधाव किती ही
चुटकीसरशी माज उतरतो
वधारला जर भाव कितीही
नकोत खंजर पाठित मित्रा
छातीवर दे घाव कितीही
सणासुदीला आठवतो मग
दूर असू दे गाव कितीही
लाटांवरती डगमगते ही
असली मोठी नाव कितीही
विरोधकांना नमवू आपण
जरी आखले डाव कितीही
२.
दंगल घडते कशाकशाने मला विचारा
संकट टळते कशाकशाने मला विचारा
जंगल, डाकू, दास्यु सुंदरी नसते कारण
चंबळ जळते कशाकशाने मला विचारा
पुजा, अर्चनाने का कोणा दगड पावतो ?
मंगल घडते कशाकशाने मला विचारा
मैत्रीसाठी सूर जुळावे लागतात पण
संगत मळते कशाकशाने मला विचारा
ढेकर देती तृप्त होउनी पानावरती
पंगत उठते कशाकशाने मला विचारा
शेर, वाहवा, टाळ्यांनी का मैफल सजते ?
रंगत चढते कशाकशाने मला विचारा
जीभ घसरते नकळत की घसरवली जाते
फंबल उडते कशाकशाने मला विचारा
..............................................
रोशनकुमार शामजी पिलेवान,
मो. ७७९८५०९८१६
No comments:
Post a Comment