तीन गझला : महेश मोरे

 



१.


काय माहित कसा जन्मभर राहिला

फाटलेला खिसा जन्मभर राहिला


फक्त तू एकदा स्पर्श केलास पण

जीव वेडापिसा जन्मभर राहिला


तू मलम लावला यार! नाहीस मग

घाव होता तसा जन्मभर राहिला


ती गुलाबी जखम जन्मभर राहिली

तो गुलाबी ठसा जन्मभर राहिला


मुखवट्यांवर कशी भाळते दूनिया

हे बघत आरसा जन्मभर राहिला


हाय! देहास स्पर्शून गेली झुळुक

थरथरत कवडसा जन्मभर राहिला


दान केलास तू श्वास माझा मला

एक उपकार-सा जन्मभर राहिला


२.


काळिज कुठले? पडका वाडा आहे हा

आठवणींचा जुना ढिगारा आहे हा 


नाव तिचे निघताच पापणी डबडबते 

फसवणुकीचा स्पष्ट पुरावा आहे हा 


नजर वाटते तितकी साधी नाही ही 

एक पिंजरा...जगावेगळा आहे हा


एक ग्लास भरलेला दिसतो आहे ना ?

(विरहावरचा जुना उतारा आहे हा)


म्हणायचे ना म्हणून 'माणुस' जग म्हणते 

श्वासांवाचुन फक्त सापळा आहे हा


डोळ्यांमध्ये कचरा गेलेला नाही

गळण्याआधीचा ओलावा आहे हा 


जखमेसोबत रक्त कसे हे दरवळले ?

पायाखाली कसला काटा आहे हा ?


कशी कळेना...चढलेली उतरत आहे

तिच्या घराचा बहुधा रस्ता आहे हा


शेर,गझल,मतला,मिसरा अन् ही व्वाव्वा 

दुःख लपवण्याचा देखावा आहे हा


३.


दुःख होते द्यायचे तर द्यायचे होतेस ना

या निमित्ताने तरी तू यायचे होतेस ना


काळजाच्या आतमध्ये ठेवले होते तुला

तू मला चोरून तेथुन न्यायचे होतेस ना


पापण्यांनी पापण्यांशी बोलली असशील पण

एकदा ओठांसवे बोलायचे होतेस ना


पापण्यांतुन रोज ठिबकत राहिलो नसतोच मी

पापण्यांवर तू मला ठेवायचे होतेस ना


पावलांवर चार मी येऊन होतो थांबलो

एकतर पाऊल तू टाकायचे होतेस ना


का उभी केलीस स्वप्ने बेरकी डोळ्यांपुढे

जायचे होते तुला तर जायचे होतेस ना


लाख मी असतील दुःखे मांडली गझलेमधे

तू तुझ्या मर्जीप्रमाणे गायचे होतेस ना


मी दिली दस्तक तुझ्या दारावरी पण शेवटी

दार तू तेव्हातरी उघडायचे होतेस ना

..........…...............................


No comments:

Post a Comment