तीन गझला : यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे





१.


गर्दीमध्ये माणूस कुठे, कुठेच दिसला नाही

रस्त्यावरचे प्रेत पाहुनी कुणी थबकला नाही


चेहऱ्यास ती मस्त इस्तरी छान सोहळा होता

जो तो आला हात हलवला परंतु हसला नाही


मित्र भेटला शब्द वाटले महाग इतके सारे 

दुरुन दावले घर त्याचे पण चलना म्हटला नाही


आईवरची कविता ज्याची खूप गाजली भारी

ती गेल्यावर डोळा याचा काही भिजला नाही


पडला उठला मग धडपडला पुन्हा एकदा पडला

पहिल्यांदा जर पडला त्यातुन काही शिकला नाही


पैशामागे धावत गेला धाप लागली आता

निसर्ग इतका सुंदर तेंव्हा क्षणभर जगला नाही


संभाजीने मृत्यूसोबत करार केला होता

कणकण झाला देहाचा पण माथा झुकला नाही            

  

२.

           

मैत्री केली जखमांशी अन् सुटलो आता

प्याल्यामध्ये भरून अश्रू बसलो आता


त्याच त्याच त्या रडगाण्यांनी कहर मांडला

जरा सुखाचा शब्द पाहिजे विटलो आता


युगायुगांची उन्हे पाळली अंगणात मी

ती आल्यावर मिठी मारली भिजलो आता


चंद्र वाहिला सूर्य वाहिला खांद्यावर पण

संध्या थकली मीही थोडा थकलो आता


भिजतील तुझी सर्व लाकडे जर का रडला

जळण्यासाठी म्हणून लवकर हसलो आता

 

३.


गझला माझ्या बोलतील का वाट पाहतो

दुःख जगाचे मांडतील का वाट पाहतो


शब्दांना मी चार दिशांना दूर धाडतो 

सुंदर सारे आणतील का वाट पाहतो


आई-बाबा नेतो आहे माझ्याचकडे

यावर भाऊ भांडतील का वाट पाहतो


ओळींखाली अर्थ वेगळा असतो काही

वाचक तोही वाचतील का वाट पाहतो


सोंग घेतले झोपेचे बघ ज्यांनी कोणी

देशासाठी जागतील का वाट पाहतो


मैत्रीखातर म्हणतात मला किती चांगला

दोष आतले सांगतील का वाट पाहतो


क्षणभंगुरता कळते आहे वळते कोठे

विश्व सत्य हे जाणतील का वाट पाहतो  

...…...............…...................

यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे, बदलापूर

मो.९८९२३३३६८३ 

No comments:

Post a Comment