१.
तिने दिलेले फूल गुलाबी वहीत माझ्या जपले होते
प्रेमाचे खतपाणी केले फूल तरीही सुकले होते
किती काळजी जरी घेतली हळूच त्याने साथ सोडली
झाडावरचे पान कोवळे देठ सोडुनी तुटले होते
रोज कितीही धडपड केली क्षणभंगुर या जगण्यासाठी
मरणे केवळ शाश्वत असते आता त्याला पटले होते
नैराश्याने, वैफल्याने मनामधे अंधार दाटला
बाह्य झगमगाटाने तरिही डोळे त्याचे दिपले होते
जरी जिंकले जगास साऱ्या त्याने त्याच्या सामर्थ्याने
जेतेपण हे त्याचे केवळ मृत्यूपुढती हरले होते
फूल पाकळी तोडत म्हणतो नकार की होकार असावा
हवेहवेसे उत्तर त्याच्या प्रश्नामधेच दडले होते
कामी नाही आले कोणी तेव्हा सारे सारे कळले
पहिल्यापासुन विश्वासाचे गणितच माझे चुकले होते
२.
दिल्या घेतलेल्या वचनांची होते आहे चर्चा
फसवुन केलेल्या हत्यांची होते आहे चर्चा
मनोरथेही रचली होती उज्ज्वल भवितव्याची
उजाड झालेल्या स्वप्नांची होते आहे चर्चा
किती गमवले जीव तरीही फरक कुणाला पडतो ?
मेलेल्यांहुन जगलेल्यांची होते आहे चर्चा
विपरित घडता जरी डागल्या आरोपांच्या फैरी
नकळत घडल्या अपघातांची होते आहे चर्चा
"विझणारा मी तारा" म्हणुनी उजळुन आली होती
म्हणुन पर्नियाच्या* कवितांची होते आहे चर्चा
सत्तेसाठी अविरत चाले अन्यायाचे संगर
माणुसकीच्या या युद्धांची होते आहे चर्चा
.
*पर्निया अब्बासी - इस्रायली बॉम्ब हल्ल्यात संपूर्ण कुटुंबासह मृत्युमुखी पडलेली इराणी युवा कवयित्री
३.
आर्त काही आठवांचा काळजावर वार होतो
व्यर्थ अश्रू वाहताना पापण्यांना भार होतो
बेगडी नात्यातुनी हे पाश सारे गुंतलेले
टाळते मी रोज त्यांना त्रास त्यांचा फार होतो
रोजचे ते कल्पनांचे ताट केवळ वाढलेले
पोट भरते मात्र तेव्हा साजरा सणवार होतो
कोवळेसे स्वप्न होते कोवळासा हुंदका तो
तोडलेल्या त्या कळ्यांचा निर्दयी व्यापार होतो
बंधनांना तोडण्याची पाहते ती कैक स्वप्ने
लाभते स्वातंत्र्य जेव्हा, जन्म सारा पार होतो
चांगले तू वाग थोडे चांगले वागेन मीही
भावनांचा का इथे हा वेगळा बाजार होतो
बांधलेले कैक इमले मी जरीही कल्पनांचे
एक मजला वास्तवातुन पण कुठे साकार होतो
.....….....................................
निशा काळे,डोंबिवली,
मो. 9029160630

No comments:
Post a Comment