१.
गुंतत जातो, कुणी अचानक व्यसनामध्ये जाचक
सवयच जडते हळूहळू मग ठरते त्याला मारक
आयुष्याचा मार्गच खडतर किती घाट अन् वळणे
वळणावरची वाट निसरडी तशीच असते घातक
विपश्यना अन् परमार्थाने मिळते आत्मिक शांती
ईश्वरसेवा चिंतन करून बनतो कोणी साधक
सुटतो ताबा गाडीवरचा निष्काळजीपणाने
मृत्यू दिसतो पुढ्यात तेव्हा सतर्क होतो चालक
किती पुरवतो लाड जिभेचे मनुष्य येता-जाता
व्याधी छळते, होउन बसते या देहाची मालक
कुपोषीत जर माता असली, कसे घडावे अर्भक
सकस आहार, पोषण देउन घडेल सुदृढ बालक
व्यसनापायी वाया गेले आजकालचे तरूण
भविष्य छळते तरुणाईचे चिंतित दिसतो पालक
२.
पतंगाचे मरण कळते दिव्यालाही
दिलासा देत जातो काळजालाही
गुलाबी स्वप्न तेव्हा पाहिले होते
भुरळ प्रेमात पडते यौवनालाही
उराशी माळल्या मी वेदना सहजच
किती समजावले कोमल मनालाही
बिघडला ताल अन् समतोल पृथ्वीचा
तशी मग लागली चिंता जगालाही
न केलेल्या गुन्ह्याची भोगतो शिक्षा
सतत का दृष्ट लागावी सुखालाही
पराक्रम रावणाचा सर्वश्रृत होता
सतीचे हरण नडले रावणालाही
३.
जुन्या माणसांनी जगावे कसे
पिढीशी नव्या मग जमावे कसे
सुखाची बदलली अशी धारणा
अचानक बदल आचरावे कसे
विकासात येतो किती अडथळा
बदल फार पचनी पडावे कसे
इथे पावसाविन बळीचे मरण
सुखाचे दिवस मग दिसावे कसे
उगा मोह मायेमधे गुंततो
विकारी मना आवरावे कसे
कुठे चालली बघ पिढी आजची
सुसंस्कृत मुलांनी घडावे कसे
................................................
No comments:
Post a Comment