१.
कोणत्याही कामात देवा ठेवली नाही कसर
मीच संसारात सारे रंग भरले आजवर
याच रंगानी दिला *मज* शेवटी आश्रय *मला*
जाळले होतेस जेव्हा काळजाचे तू नगर
कोणत्याही औषधाने ना जखम भरणार ही
घाव शब्दांचा तुझ्या रे खूप झाला आतवर
पाहिला ना काळ केव्हा पाहिली ना वेळही
ठाकलेली मी उभी अन् खोचलेला हा पदर
धावले हाकेस कायम मोजल्या ठेचा न मी
ठेवला नाही कधीही कोणताही आपपर
शिल्पही संगीतही अन् नृत्यही देहात या
ते बघाया तुज कशी रे लाभली नाही नजर
२.
सावल्यांनीही दिला मज त्रास नुसता
चांदणे आहे खरे की भास नुसता
सोड चिंता, घे भरारी तू नव्याने
दोष का देतोस रे नशिबास नुसता
गोडवे गातो जरी आधुनिकतेचे
जुंपला माणूस हा यंत्रास नुसता
गुणगुणावी गझल एखादी जराशी
जीवनाला ना पुरेसा श्वास नुसता
शोधताना भाकरीचा चंद्र 'नाहिद'
जिंदगीचा जाहलो मी दास नुसता
३.
पाहिला नाही कधी जो चेहरा, तो शोधतो मी
जे कधी घडलेच नाही तेच किस्से सांगतो मी
सांगता येते कुठे केवढा लागेल अवधी
काम सरकारी म्हणूनी शक्यतोवर टाळतो मी
सावली, पाने, फुले अन् छानशी देतो फळेही
नवनवे संसार इवल्या पाखरांचे पाहतो मी
एकदा का कोट काळा चढविला खांद्यावरी मग
कायद्याने कायद्याचा नीट काटा काढतो मी
लागतो माझा लळा त्या ज्या कुणाला भेटतो मी
याचसाठी षोडशांना भेटण्याचे टाळतो मी
वाटते पटते मनाला तेच करतो शेवटी पण
काळजीपूर्वक जनांचे बोलणेही ऐकतो मी
...........….…..…....................
नाहिद नालबंद
(मो. ९९२१ १०४ ६३०)

No comments:
Post a Comment