तीन गझला : विजय वासाडे

 



१.


सोडून 'मी'पणाला, राहून बघ जरासा

कटुता मनातली तू त्यागून बघ जरासा


दोनच दिवस मजेचे, आहेत जिंदगीचे

वागून प्रेमभावे चालून बघ जरासा


नाहीच आज हाती, जर कामकाज काही

शेतात घाम थोडा गाळून बघ जरासा


फुकट्यास देत नाही कोणीच भाव येथे

कष्टात राम मित्रा, शोधून बघ जरासा


करतो कशास येथे नुसत्या उचापती तू

आरोप बिनबुडाचे टाळून बघ जरासा


येथेच जन्म झाला, येथेच वाढला तू

भाळावरी तिरंगा मिरवून बघ जरासा


हकदार ती खरी पण, नाही मिळत जराही

सन्मान रोज स्त्रीला देऊन बघ जरासा


२.


आहे सदैव त्याचा कर्जात सातबारा

घेऊन बाप फिरतो हातात सातबारा 


खरडून शेत अवघे नेऊनही पुराने

येतो पुन्हा नव्याने जोशात सातबारा


चढवून बॅंक-बोजा धनको निवांत झाले

नाहीच मालकाच्या ताब्यात सातबारा


उत्पन्न अल्प आले, फेडू कुणाकुणाचे

येतो तिथे अचानक वांद्यात सातबारा


कसण्यास कोण नव्हते पण हाव वाटणीची

नादान वारसांच्या वादात सातबारा


३.  

 

वस्तीत माणसांच्या अंधार पाहिला मी

वादात भावकीचा संहार पाहिला मी


आम्हात काल होता सज्जन बरा बिचारा

त्याच्यात गुंड आता खुंखार पाहिला मी


कित्येक वर्ष झाली जिंकून तोच येतो

नेता तरी नव्याने लाचार पाहिला मी


पाठीत वार करणे त्याची सवय पुराणी

या माणसापरी ना गद्दार पाहिला मी


आला जमानतीवर बाहेर तो मवाली

जाहीर आज त्याचा सत्कार पाहिला मी


पाहून एकटीला पडले तुटून सारे

रस्त्यात लांडग्यांचा संचार पाहिला मी 


गावात काल त्यांच्या आभाळ फाटल्यावर

उध्वस्त भावनांचा बाजार  पाहिला मी

.............................................

विजय माणिकराव वासाडे

मो.८२०८५८३३०९

No comments:

Post a Comment