तीन गझला : सौ. रश्मी कौलवार

 




दररोज सुप्त इच्छा दाबायची सवय

झाली कशी मनाला मारायची सवय ?


प्रत्येक माणसाने जोपासली किती

आपापल्या चुकांना झाकायची सवय 


त्याची कधी कधी छळते घोर लावते 

ताकास तूर लागू ना द्यायची सवय


समजावले मनाला हो शांत तू जरा 

होईल आसवांना जाळायची सवय


ती भासते जरीही लांबून चांगली

पण घातकीच असते भाळायची सवय


झरझर लिहून कविता करते कमी व्यथा 

कल्लोळ आतला हा मांडायची सवय 


कळते जरी नव्याने आहे जुनी तशी

मेंदूसवे मनाला भांडायची सवय


२.


आठवणींचे पुस्तक मीही वाचत नाही 

उचकी माझ्यामुळे कुणाला लागत नाही 


ब्रेकच नाही आठवणींच्या या गाडीला 

येणेजाणे चालू असते थांबत नाही


देउन जाते जरी हजारो स्वप्ने हाती

रात्र आपले एकाकीपण वाटत नाही !


हलतो आहे ढिला खिळा हा विश्वासाचा 

म्हणून कोणी मनात फोटो टांगत नाही!


पृथ्वीपेक्षा छानच आहे आकाशाचे 

एक चांदणी दुसरीसोबत भांडत नाही!


शुन्यामध्ये बघता बघता शून्यच होतो 

पण म्हातारा मनातली सल सांगत नाही!


इच्छेचा का देठ कोवळा दिसतो कायम?

हे हिरवेपण हात तिचा का सोडत नाही!


३.


पूल आहे जोडणारा की दरी आहे 

जोडते दोघासही काहीतरी आहे


पूर्ण करते जीवनाच्या सर्व इच्छांना

आपली आई खरोखरची परी आहे 


चंद्र फिरतो भोवताली फक्त पृथ्वीच्या 

ओढ दोघांच्या किती ही अंतरी आहे 


नेमकी डोळ्यांत सजते आसवे होउन 

वेदनेची ओल इतकी भरजरी आहे 


नाद होता स्वप्न वेडे पाहण्याचा पण 

सोडला तेव्हाच, आता मी बरी आहे 


आपल्यातच वाद राहू दे विषय संपव

तू खरा आहेस पण मीही खरी आहे 


नांदतो हृदयात विठ्ठल मंदिरी नाही

मानले तर घर तुझेही पंढरी आहे

..............................................

No comments:

Post a Comment