तीन गझला : डॉ. स्वाती भद्रे आकुसकर

 




१.


उन्हावर चांदणे पसरायच्या आधी 

निघूया पावले जड व्हायच्या आधी 


तुझ्या स्पर्शात आहे कोणते अत्तर 

फुले गंधाळली माळायच्या आधी 


मनाशी बांधल्या आहेत खुणगाठी

तुझी एकेक सल विसरायच्या आधी 


मनाचे काय तू करशील त्यानंतर

कुठे जर गुंतले समजायच्या आधी 


कुठेही आसऱ्याला सावली नव्हती 

उन्हे जगले तुला भेटायच्या आधी 


उगवला चंद्र आहे का पहा कोणी 

इथे सारे दिवे विझवायच्या आधी 


समुद्रावर खुणा ठेवून जा स्वाती 

पुन्हा तारांगणी परतायच्या आधी 


२.


विसरताना जसा नकळत कुणी कोणास आठवतो 

तसा आभाळ आल्यावर तुझा सहवास आठवतो


अता इतकी सवय झाली व्यथेची काय सांगू मी

म्हणूनच तर सुखाच्याही घडीला त्रास आठवतो


उभे आयुष्य रखरखत्या उन्हाचे रान आहे पण 

तुझ्या डोळ्यांत बघताना मला मधुमास आठवतो 


अता हातास बांधुन हात ती निजतेय आईचा

सतत कर्जात बापाचा तिला गळफास आठवतो


जगाला आठवण येते तुझी दु:खामधे स्वाती 

कधी त्रासाविनाही रूग्ण का वैद्यास आठवतो 


३.


ऋतू पोचायच्या आधी फुलावे लागले 

किती लवकर कळ्यांना प्रौढ व्हावे लागले 


कुणाचे हास्य सोबत जोडले गेल्यामुळे 

मलाही नाइलाजाने हसावे लागले 


तुला माहीत आहे फक्त मी आहे तुझी

जगाला केवढे त्याचे पुरावे लागले 


सुखाचे स्वप्न होते जागले डोळ्यांत पण

व्यथेला अंथरावे-पांघरावे लागले


कधी केलीस ज्याची नेहमी पारायणे

तुला ते नावही मग आठवावे लागले 


शहाणे फक्त असणे चालते येथे कुठे 

शहाणे सर्व दुनियेला दिसावे लागले


निराळे आपल्या दोघांतले होते ऋतू 

भिजायाच्या सरीमध्ये झुरावे लागले

..............................................

No comments:

Post a Comment