१.
घालू नकोस वेड्या तू हात काळजाला
होईल त्रास त्याचा माझ्याच माणसाला
घर आपलेच होते वाळूत बांधलेले
देणार काय होते आधार जीवनाला
ती गोष्ट आजही जर माझ्या-तिच्यात आहे
सांगा विचारता का? खोचून वारसाला
काळा म्हणून गेले जे लोक वावराला
म्हणतात शुभ्र सोने त्याच्याच लेकराला
वेळीच बोट माझे सोडून ती दिल्याने
झाला उशीर नाही माझ्या उभारण्याला
अख्खाच वेदनेच्या सूर्यास जो गिळाला
पाऊस, ऊन, वारा हे काय वानराला
मेलो तरी सुखाने देतील का जळू ते
करतील राख माझी विझवून विस्तवाला
२.
जे मला वाटते ते तुला वाटते का?
जे मला चालते ते तुला चालते का?
दोन डोळ्यांमधे चालले हेच होते
जी मला पाहते ती तुला पाहते का?
ही हवा गारव्याची हळू सांजवेळी
जे मला सांगते ते तुला सांगते का?
त्रास होतो मनाला विखारी उन्हाचा
जे मला मारते ते तुला मारते का?
नाव घेऊन आता लगातार उचकी
जी मला छेडते ती तुला छेडते का?
चंद्र, तारे नभाचे बघत रातच्याला
मी इथे जागतो तू तिथे जागते का?
जिंदगीभर तुझी वाट पाहीन मीही
मी तुला मागतो तू मला मागते का?
आणतो गंध वारा तुझ्या अंगणाचा
आजही याद माझी फुले गाळते का?
भास होतो मनाला तुला पाहिल्याचा
मी तुला शोधतो तू मला शोधते का?
३.
आरसा का पाहतो माहीत नाही
चेहरा का वाचतो माहीत नाही
बाग असताना कडेने भृंग आता
एकटा का बोलतो माहीत नाही
चांदण्या सोडून आकाशात खाली
तो नजर का फिरवतो माहीत नाही
कोण नसताना तिच्याशी धुंद वारा
तो असा का वागतो माहीत नाही
मोकळे केले तिने तर केस सारे
मोगरा का लाजतो माहीत नाही
भिंत वाळू, झाड, लाटांवर कुणाच्या
स्वप्न तो का पेरतो माहीत नाही
प्रेम झाले आणि तुटले वेल गेली
भोपळा का लटकतो माहीत नाही
…...........................................
No comments:
Post a Comment