१.
जातो दिवस कसाही लोकात बोलक्या
रात्रीस वेदनाही होतात बोलक्या
क्षमता असून कोणी मागेच राहतो
संधी अनेक येती हातात बोलक्या
वेळेस मौन नेते तारून पाहिले
असते कुणी जगी या प्रेमात बोलक्या
नाही निराश वृत्ती की बेगडी हसू
मनमोकळे जगावे रोमात बोलक्या
संवाद आज नाही नात्यात राहिला
नाती फुलून येती ओठात बोलक्या
२.
आयुष्याचा हिशोब मोजत उगाच बसते बाकी
कर्मावाचुन अखेरीस त्या काही उरते बाकी?
किती ठेवला ताठ कणा पण माघार चुकत नाही
नात्यांसाठी कितीक वेळा हार मानते बाकी
एकाकी ती लढत राहते आई असते म्हणुनी
विस्कटलेली जरी आतुनी पण सावरते बाकी
गृहीत आहे धरलेली ती एक उपेक्षित गृहिणी
घरास घरपण देण्यासाठी हसत सोसते बाकी
खुणवत असते अवकाश तिचे झेप घ्यायला मोठी
जबाबदाऱ्या निभावताना आत ठेवते बाकी
३.
जागते रात्र वेडी उपाशी
चांदवा मागते ती नभाशी
बंद केली कवाडे मनाची
साचते केवढे मग तळाशी
टोचणारे किती सोडलेही
खंत राहून जाते उराशी
धावते सारखी जीवघेणे
संपते हाव कोठे अधाशी?
चांगले ते पहाते तरीही
द्वंद्व का चालते या मनाशी ?
...............................................
No comments:
Post a Comment