१.
जसे पावसाने तुला गाठल्यावर
शहारा उमटला जणू काळजावर
फुटावा नभाला पुन्हा एक पान्हा
धरेची त्वचा शुष्क भेगाळल्यावर
उदासी धरेवर ढगा घाल फुंकर
तिचा देह फुलतो विजा नाचल्यावर
तुझ्या आर्त डोळयांत पाहून पाणी
तसा मृग बरसला तुझ्या वावरावर
तुला बिलगुनी तो सुगंधीत झाला
फुले मग उमलली तशी कातळावर
२.
शोधतो स्वतःला मी पण कुठे दिसत नाही
आरशात दिसणारा त्यास ओळखत नाही
एकटाच येताना जात एकटा असतो
सोबती कुणीसुद्धा आपला म्हणत नाही
वाहतो शिवारा मी लाल घाम रक्ताचा
पण तरी तुझा हिरवा रंग का रुजत नाही
मी अशा ठिकाणाचा शोध लावला आहे
रात्र ना जिथे सरते सूर्य मावळत नाही
एवढे कसे कट्टर ना कळे कधी झालो
माणसातला माणुस धर्म दाखवत नाही?
३.
सारे गेले शहरामध्ये, सुने सुने तळमळले अंगण
अन् डोळ्यांच्या पागोळ्यांनी तुडुंब मागे भिजले अंगण
गॅलरीतुनी पाहत असतो आठवणींचे भरले अंगण
नका गमावू कधी कुठे जर तुम्हासही सापडले अंगण
इथे रांगली आणि खेळली बघता बघता झाली मोठी
लेक चालली जशी सासरी देत हुंदके रडले अंगण
वादळवाऱ्यामध्ये जेव्हा कोलमडुन घर पडले होते
कुशीत त्याच्या निजलो तेव्हा जरा कुठेसे कळले अंगण
मौजमजेने झुलले अंगण आनंदाने फुलले अंगण
जीवनातल्या क्षणाक्षणाला रुसले अंगण हसले अंगण
किती कोरडे झालो
अंती सारे सोडुन जसे चाललो
निरोप आम्हाला देताना थोडेसे घुटमळले अंगण
घराबरोबर अंगण गेले उभी राहिली बडी इमारत
इमारतीच्या भवती आता कुठेच नाही उरले अंगण .............….............................
No comments:
Post a Comment