१.
फक्त एकदा चुकलो, सारे दगड म्हणाले बाबा
अकलेसाठी पाय कुणाचे पकड म्हणाले बाबा
"रोज वाढत्या अन्यायावर उपाय सांगा काही"
सदैव अपुल्या हक्कासाठी झगड म्हणाले बाबा
चुकलो होतो, सरलो नाही, जाण एवढी होती
पुन्हा स्वतःला असाच कायम रगड म्हणाले बाबा
शिकलो सारे, पुढे धावलो, स्वाभिमान पण नाही
जुन्याच जखमा पुन्हा नव्याने चिवड म्हणाले बाबा
या देशाच्या कल्याणाचा मार्ग तेवढा सांगा
प्रथम स्वतःची स्वार्थभावना खुरड म्हणाले बाबा
२.
ते शब्दांचे सुरुंग पेरत आहेत आता
वस्त्या, तांडे, शहरे जाळत आहेत आता
दिसावयाला वसंत असतो तयांच्या ओठी
घटपर्णीचा स्वभाव पाळत आहेत आता
ज्वलंत मुद्दा दूर ठेवण्यासाठीच केवळ
अफवांनी जनतेला लढवत आहेत आता
मोक्याच्या जागेवर हस्तक बसवून सारे
न्यायाचीही खिल्ली उडवत आहेत आता
दंगे-धोपे, खून, दरोडे रोजचे तरिही
बरे चालले निरोप कळवत आहेत आता
३.
देश कोणता? वारा कुठला? कळले नाही
बघता बघता कसा पेटला ? कळले नाही
सभोवताली हर धर्माचे वर्तुळ होते
मधे तयांच्या अग्नी दिसला, कळले नाही
तोच जो सदा दिल्लीमधल्या गप्पा मारी
गल्लोगल्ली फिरू लागला, कळले नाही
पुन्हा भरूया गगनभरारी, ठरले अमुचे
अन् नवसाचा नारळ फुटला, कळले नाही
राबराबला पोशिंदा पण मात्र शेवटी
त्याचा वाटा कुणी चोरला? कळले नाही
वाचत होता तिची कहाणी सहज जरी तो
कंठ दाटला, पेटुन उठला, कळले नाही
एकजुटीने पुढे निघाला जरी काफिला
मधेच त्याला कोण भेटला? कळले नाही
..............................................
दिलीप सीताराम पाटील
मो. 8390893961
No comments:
Post a Comment