तीन गझला : सुरेंद्र टिपरे

  




१.


थांबला का दूर तेथे ये जरा जवळून बघ तू

तेवणाऱ्या या दिव्याला ये जरा स्पर्शून बघ तू


दुःख झाडाचे तुला कळणार नाही रे असे ते

सोड तू त्या सावलीला अन् जरा ते ऊन बघ तू


काय सरड्यासारखा होतो वृथा रे ताठ तू ही

नम्रता सन्मान देते सांगतो वाकून बघ तू


हे गुलाबी सोन पिवळे रंग सारे पाहताना

सावळ्याच्या श्याम रंगी ही जरा रंगून बघ तू


मोकळे वाटेल रडल्यावर तुला बघ छान मित्रा

वेदनांना आसवांनी एकदा क्षालून बघ तू


ती तुझे सौभाग्य आहे ठेव  ध्यानी माणसा तू

एकदा कंठी स्वतःच्या 'डोरले' बांधून बघ तू


२.


'जान मेरी' बोलल्याने होत नाही '

जान' कोणी

राहिल्या नाहित मुली तितक्या अशा नादान कोणी


नाव आहे वेगळे पण बीज आहे माणसाचे

पाळतो श्रावण कुणी अन पाळतो रमजान कोणी


उचलती तेजीभ पटकन लावती टाळूस अपल्या

सोडती आज्ञा कुणी अन् तुघलकी फर्मान कोणी


झाकती अज्ञान अपुले अन म्हणवती जेष्ठ आहे

दावतो खोटी हुशारी बेगडी हे ज्ञान कोणी.


मागणी इतकीच आहे सभ्यतेची आज माझ्या

चांगल्याला चांगले अन् व्वा! म्हणावे छान कोणी


३.


थोडे खुपले-दुखले मित्रा जाऊ दे की 

गुपित आपले-तुपले मित्रा जाऊ दे की 


उगाच कारण रडण्याचे मी सांगत नाही 

डोळे माझे धुतले मित्रा जाऊ दे की 


नकोच काढू याद तिची ती आता मित्रा 

घाव अता ते सुकले मित्रा जाऊ दे की 

 

किंचित होता भेद मतांचा, ठीकच आहे 

मौन तुझे ते खुपले मित्रा जाऊ दे की 


संकटात जे साथ सोडती अपुली मित्रा 

उगाच नाते जपले मित्रा जाऊ दे की


कोर्ट कचेरी कशास करतो वृथा अता रे

किती लटकले खटले मित्रा जाऊ दे की 


नकोच भांडण आपल्या मधे तुला सांगतो 

सॉरी माझे चुकले मित्रा जाऊ दे की

.............................................

No comments:

Post a Comment